
विधानपरिषद निवडणुकीतील चित्र बदलणार; 'या' कारणामुळे महाविकास आघाडीची लागणार कसोटी
दरम्यान, जिल्ह्यात काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील एकमेव आमदार विधान परिषदेच्या कोट्यातून उरले आहेत. महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवून विधानपरिषदेवरही आता आपला हक्क सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विद्यमान आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आमदारकी टिकवण्यासाठी त्यांना आता प्रचंड राजकीय कसरत करावी लागणार असून, केवळ पक्षीय ताकदीवर ही लढाई जिंकणे कठीण ठरण्याची शक्यता आहे.
नगरपालिका निकालांमधून काही ठिकाणी महाविकास आघाडीला बसलेला फटका आणि स्थानिक पातळीवरील बदलती समीकरणे याचा थेट परिणाम विधानपरिषद निवडणुकीत जाणवण्याची चिन्हे आहेत. नगरपालिकांतील यशाने महायुतीमध्ये मात्र आत्मविश्वासाचे वातावरण आहे. नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या एकहाती सत्तेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून, हीच लय कायम राखत विधानपरिषद आणि पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही यश मिळवण्याचा निर्धार महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल आणि त्यानंतर होणारी राजकीय जुळवाजुळव यावरच विधानपरिषद निवडणुकीतील अंतिम चित्र अवलंबून राहणार हे मात्र नक्की.
आता पर्याय जिल्हा परिषदेचा
आता महाविकास आघाडीसमोर एकच महत्त्वाचा पर्याय उरतो, तो म्हणजे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत भरीव यश मिळवणे. जिल्हा परिषदेत सत्ता किंवा मजबूत संख्याबळ मिळाले, तरच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची गणिते बदलू शकतात आणि विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी पुन्हा दावेदार ठरू शकते. अन्यथा महायुतीची आघाडी अधिक भक्कम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाविकास आघाडीची कसोटी
कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती एकत्रित लढण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी दोन्ही शहरातील स्थानिक आघाडीला सोबत घेऊन ही निवडणूक लढणार आहे. नगरपालिका निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यामुळे सहाजिकच या दोन्ही महापालिका निवडणुकीत महायुतीकडे इच्छुकांचा मोठा भरणा वाढला आहे. यातून उमेदवारी न मिळणारे कदाचित महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात. हिच संधी साधत महाविकास आघाडी दोन्ही महापालिकेत नाराज चेहऱ्यांना घेऊन विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.