आमदार थोरवेंच्या भाच्याकडून कामगारांची फसवणूक, बंद पडलेल्या कंपनीच्या भुखंड खरेदी विक्रीतून नफेबाजी (फोटो सौजन्य-X)
कर्जत : कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचा भाचा संकेत भासे यांनी केलेल्या खालापूर तालुक्यातील के.डी.एल बायोटेक कंपनीच्या बंद पडलेल्या कारखान्याच्या ३६ एकरच्या भुखंड खरेदी आणि विक्री प्रकरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. ही कंपनी सन २०१३ साली बंद पडल्यामुळे कंपनीतील ७०० कामगार बेरोजगार झाले. या कामगारांना कंपनीकडून कसलाही मोबदला मिळाला नाही, त्यामुळे कामगार आक्रमक झाले असून त्यांनी कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी आमदार थोरवे यांचे भाचे संकेत भासे यांच्यावर आरोप केले आहेत.
खालापूर तालुक्यातील सावरोली येथे असलेली के.डी.एल बायोटेक कंपनी सन २०१३ मध्ये बंद पडली. त्यामुळे या कंपनीच्या कारखान्यातील २१४ पर्मनंट कामगार व इतर कंत्राटी कामगार असे जवळपास एकूण ७०० कामगार बेरोजगार झाले. यातील २१४ पर्मनंट कामगार कामगारांनी ग्रॅज्युएटी आणि ५७ महिन्याचा साधा पगार मिळण्यासाठी समापक न्यायालयात लढा दिला. या लढ्यात कामगारांना यश देखील आले.
मात्र कंपनीकडून कामगारांना अद्याप मोबदला मिळाला नाही. कंपनीने येथील कारखान्यातील मशिनरी, साहित्य हलविले आणि कारखान्याचा भूखंड आमदार थोरवे यांचा भाचा संकेत भासे आणि त्यांचे सहकारी परेश नंदलाल शेट, रोशन प्रदीप शहा यांना विकला. या भूखंडाची किंमत साधारण बाजारभावानुसार ७२ कोटी असून तो केवळ २२ ते २४ कोटी रुपयात संकेत भासे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकत घेतला आणि दुसऱ्या कंपनीला मोठ्या किंमतीने विकल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. विधानसभा निवडणुक २०२४ च्या दरम्यान संकेत भासे यांनी कामगारांना त्यांची कंपनीकडील मोबदल्याची रक्कम दोन महिन्यात मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणुक झाल्यानंतर आज अखेर भासे यांनी कामगारांशी याबाबत कसलाही संवाद साधला नाही.
या कारखान्याचा भूखंड भासे यांनी दुसऱ्या कंपनीला विकल्याचे कामगारांच्या लक्षात आल्यानंतर २ जुलै रोजी कामगारांनी कंपनीच्या फाटकासमोर येत आंदोलन केले, यावेळी पत्रकार परिषदेत कामगारांनी भासे यांच्यावर आरोप केले आहेत. यावेळी कामगार संतोष केदारी गजानन बैलमारे, किशोर घोसाळकर, प्रशांत गोपाळे अनिल मोरसिंग, दिलीप बारड, शैलेश बैलमारे, चंद्रकांत बैलमारे, अशोक पाटील सचिन पाटील, चणाराम मुआल, गुरुदत्त घोसाळकर, बाळासाहेब कदम, मनोहर कदम, सखाराम भेसरे,चंद्रकांत उजगावकर यांच्यासह बहुसंख्य कामगार उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन व्यथा मांडणार असल्याचे कामगारांनी माहिती यावेळी कामगारांनी दिली.
कंपनीच्या व्यवस्थापनाने मोबदला न दिल्यामुळे २१४ कामगारांवर उपासमारीची वेळ आली असताना संकेत भासे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कंपनीच्या भूखंड खरेदी विक्री करुन कोट्यवधी रुपये नफा कमावला, पण कामगारांना त्यांचा मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे कामगार आक्रमक झाले असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.
कंपनी बंद झाल्यावर हिशोब मिळण्याची अपेक्षा होती. पण एक कवडीही मिळालेली नाही. कामगारांनी सहकार्याची भूमिका घेऊनही आतापर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही. सत्तेचा दबाव आणून ७२ कोटीची प्रॉपर्टी कवडीमोल भावात आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे संकेत भासे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खरेदी केली. आमदारांना भेटूनही एक रुपया मिळालेला नाही. निवडणूक काळात हिशोब देण्याचं आश्वासन दिलं गेलं. पण फायदा कमविण्यासाठी संकेत भासे नी ही जमीन १०० कोटींपेक्षा अधिक किमतीला विकली. कंपनीतल्या बिल्डिंग, माती विकून पैसे कमवले. पण आमचा हिशोब पूर्ण केला नाही. हा थोरवे आणि भासे यांनी आमची फसवणूक केली. आठ दिवसात काही झालं नाही तर आम्ही अधिवेशनात आमची व्यस्था मांडू, अशी प्रतिक्रिया कामगार प्रशांत गोपाळे यांनी दिली.