मुंबई : मुंबईची लाईफलाईन (Mumbai Local) अशी ओळख असलेल्या लोकलच्या प्रवासी संख्येत मोठी घट (Local Passengers) झाल्याचे दिसत आहे. ही घट थोडीथोडकी नाहीतर तब्बल 12 लाखांनी प्रवासी संख्येत घट झाली आहे. यापूर्वी म्हणजे 2011 मध्ये दररोज सरासरी 80 लाख प्रवासी लोकलने प्रवास करत होते. पण आता हाच आकडा 68 लाखांवर आला आहे. त्याचं कारणही समोर आलं आहे.
मुंबईत लोकल रेल्वेची संख्या मोठी आहे. पण तरी देखील यातील प्रवासी संख्येत घट झाल्याचे पाहिला मिळत आहे. प्रवासी संख्या घटण्यामागील कारण खासगी वाहनांची वाढलेली संख्या आहे. 2011 मध्ये शहरात 9 लाख कार आणि दुचाकी होत्या. त्यात दुचाकींचे प्रमाण कमी होते. पण आता यामध्ये मोठी वाढ झाली आहे. आता एकूण वाहन संख्या 44 लाखांहून अधिक आहे. त्यात निम्मी संख्या दुचाकींची आहे.
बेस्ट प्रवासी संख्येतही घटच
लोकलच्या प्रवासी संख्येत घट झाल्याचे दिसत असतानाच बेस्ट बसच्या प्रवाशांची संख्याही कमी होताना दिसत आहे. कारण यापूर्वी 2011 मध्ये बेस्ट बस प्रवाशांची संख्या 39 लाख इतकी होती. मात्र, यामध्ये घट होऊन ही संख्या 35 लाखांवर आली आहे. आता सुमारे 3500 बसमधून हे प्रवासी प्रवास करताना दिसत आहे.