World Post Day 2025 : ‘पोस्टमन’ बनला डिजिटल दूत; वाढत्या तंत्रज्ञानामुळे टपाल खातं बदलतंय
पुणे/प्रगती करंबेळकर : वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक पत्र व्यवहाराची जागा डिजिटल माध्यमांनी घेतली असली, तरी टपाल खात्याचे महत्त्व आणि विश्वास आजही कायम आहे. एकेकाळी केवळ पत्रे आणि पार्सल पोहोचवणारे पोस्ट ऑफिस आता डिजिटल, बँकिंग आणि लॉजिस्टिक सेवा केंद्र म्हणून विकसित झाले आहेत. टपाल पेटी आणि पोस्ट कार्ड कालबाह्य झाले असे म्हणणे चुकीचे ठरेल. ग्रामीण भागात आजही पत्रव्यवहार सुरू आहे आणि पत्रलेखनाची कला जिवंत ठेवण्यासाठी टपाल विभाग विविध उपक्रम राबवत आहे, असे पुणे शहर पश्चिम विभागाचे प्रवर अधीक्षक नितीन येवला यांनी सांगितले.
अनेक सुविधा घरपोच
पूर्वी पत्र वितरक म्हणून ओळखला जाणारा पोस्टमन आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना डिजिटल सेवांच्या माध्यमातून जोडत आहे. आजचा पोस्टमन पारंपरिक टपाल वितरणाबरोबरच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) च्या माध्यमातून डोअरस्टेप बँकिंग सेवा पुरवतो. ग्रामीण भागात तो एक चालते फिरते एटीएम ठरला आहे. पैसे जमा-उचल, खातं उघडणं, आधार लिंकिंग, विमा आणि मनी ट्रान्स्फर अशा अनेक सुविधा तो घरपोच पोहोचवतो.
विविध भूमिका टपाल खाते बजावते
तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे दळणवळणाची साधने वाढली असली तरी, पोस्ट खात्याचा १७० वर्षांचा विश्वास आजही टिकून आहे. ज्येष्ठ नागरिक अजूनही पत्र लिहिणे, मनी ऑर्डर पाठवणं किंवा पोस्टात बचत-गुंतवणूक करणे पसंत करतात. अनेक सरकारी कागदपत्रे, परीक्षा प्रवेशपत्रे, शासकीय नोटिस, कोर्ट समन्स अजूनही टपालानेच पाठवली जातात. वाढत्या तंत्रज्ञानामुळे पोस्ट विभागाने स्वतःला नव्या युगात रूपांतरित केले आहे. आधार सेवा केंद्र, पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र, ई-कॉमर्स पार्सल वितरण, तसेच फिलाटेलीच्या माध्यमातून ज्ञानवर्धन अशा विविध भूमिका टपाल खाते बजावत आहे.
जागतिक टपाल सप्ताहाचे आयोजन
जागतिक टपाल दिन (९ ऑक्टोबर) निमित्त भारतीय डाक विभाग दिनांक ६ ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा करीत आहे. या उपक्रमात तंत्रज्ञान दिवस, आर्थिक समावेशन दिवस, फिलाटेली दिवस, ग्राहक दिवस अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
डिजिटल संदेश झटपट पोहोचतात, पण हस्तलिखित पत्रातील जिव्हाळा आणि भावनांची उब कोणत्याही माध्यमात मिळत नाही. ऑगस्ट २०२५ पासून डाक विभागाने APT IT 2.0 प्रणाली देशभरात राबवली असून त्याद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून नागरिकांना सेवा पुरवली जात आहे, टपाल खाते आज केवळ पत्र व्यवहाराचे साधन नाही, तर लोकाभिमुख, विश्वासार्ह आणि सर्वदूर पोहोचणारं डिजिटल सेवा केंद्र बनलं आहे. पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम म्हणजेच भारताचे टपाल खाते. – नितीन येवला