मुंबई – आमच्या काळात रायगडे आणला जाणारा बल्क ड्रग्ज पार्क आता गुजरातेतील भरूचमध्ये जाणार आहे. राज्यातील प्रकल्प बाहेर जात असताना मुख्यमंत्री महोदय गणेश मंडळांना भेटी देत होते, असा आरोप बुधवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य म्हणाले, निदान आता नवरात्रीत फिरू नका. एअरबस प्रकल्पात लक्ष घाला, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. फॉक्सकॉन-वेदांता गुजरातेत गेला याचा भाजप-शिंदे सरकारने खुलासा केला नाही. खरे उत्तर सरकारने दिले नाही.
आदित्य ठाकरे म्हणाले, फाॅक्सकाॅन-वेदांताबाबत गैरसमज सरकारकडून पसरवला जात आहे. आम्हालाही यासंबंधीत माहिती सोशल माध्यमातून समजत आहे. फाॅक्सकाॅन-वेदांताबाबत वेगळा एमओयूची सांगड घालून लोकांची दिशाभूल केली जात आहे. मॅग्नेटीक महाराष्ट्रात फाॅक्सकाॅनसोबतचा एमओयू अॅपलच्या आयफोनच्या अॅसम्ब्लीबद्दल होता.
आदित्य म्हणाले, गुजरातला गेलेल्या प्रकल्प स्पष्टपणे सेमीकंडक्टरशी संबंधित होता. केंद्राने यावर ७६ हजार कोटींची सबसीडी केंद्राने दिला होता. आम्ही जानेवारीत अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा करून बैठक घेतली होती आणि पाठपुरावा केला. डावोसमध्येही एमओयू करायचा होता, कागदपत्रे तयार होती. केंद्र- राज्यसरकारच्या सबसीडीसह वेदांता आणि फाॅक्सकाॅनच्या गुंतवणुकीची सांगड घालणे आवश्यक होते. त्यानंतर जूनमध्ये आम्ही भेटही घेतली पण चाळीस गद्दारांनी आपले सरकार पाडले त्यानंतर हा विषय मागे राहीला.