
राजकीय घडामोडींना वेग, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप लढत रंगणार; कोणत्या पक्षाचे पारडे जड?
राजकीय घडामोडींना वेग
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप लढत रंगणार
कोणत्या पक्षाचे पारडे जड?
पुणे : पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका महायुतीमधील घटक पक्ष हे स्वतंत्रपणे निवडणुक लढणार आहेत. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पारडे अधिक जड असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पुण्यात उपमुख्यमंत्री पवार यांनी नागरिकांच्या प्रश्नावर काम करून पक्ष विस्तार करा, असा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामाेडींना वेग आला आहे.
पुणे जिल्ह्यातील एकूण १४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार असून, जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत न होता प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचं चित्र पाहायला मिळत असून, जिल्ह्यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत होताना पाहायला मिळणार आहे.
शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयात शनिवारी सकाळपासून पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात बैठका संध्याकाळी उशिरापर्यंत पार पडल्या. तर यावेळी काही पक्षप्रवेशही झाले.
निर्मला आवारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
भोरच्या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष निर्मला आवारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार शंकर मांडेकर उपस्थित हाेते. याविषयी मांडेकर म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांपासून आवारे यांच्याशी चर्चा सुरू होती आणि आज त्यांनी विकासाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. भोरमध्ये आत्ताची भाजप म्हणजे थोपटे यांची भाजप असून, आम्ही राष्ट्रवादी म्हणून लढणार आहोत. पक्षाने स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला असून, भोरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार आहे. आमची लढाई थोपटेंची भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी होणार आहे.’’
१४ नगरपरिषद, ३ नगरपंचायतींसाठी होणार निवडणूक
पुणे जिल्ह्यातील एकूण १४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार असून बारामती, लोणावळा, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे, फुरसुंगी-उरळी देवाची, सासवड, जेजुरी, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आळंदी, भोर आणि राजगुरुनगर, मंचर, वडगाव मावळ आणि माळेगाव बुद्रुक या ठिकाणी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये थेट अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे.