संभाजीनगर : राज्यातील सर्व शाळा सुरु झाल्या आहे. पण जिल्हा परिषद शाळेत (ZP School) शिकवण्यासाठी शिक्षकच नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षण विभागाकडून कंत्राटी भरतीसाठी मंगळवारी जीआरही काढण्यात आला आहे.
कंत्राटी पध्दतीवर शिक्षकांसाठी वयोमर्यादा 70 वर्षे ठेवण्यात आली आहे. मात्र, नवीन तंत्रज्ञान अवगत असणाऱ्या शिक्षकांना संधी डावलण्यात आली आहे. कंत्राटी पध्दतीवरील शिक्षकाला मासिक 20 हजार रुपये मानधन मिळणार आहे. सर्व जिल्हा परिषद शाळांत पुढील 15 दिवसांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात यावी, असे यामध्ये नमूद करण्यात आले. जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
करारनामा करणार
प्रत्येक जिल्ह्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत. शिक्षकांची नियुक्तीची सर्व प्रक्रिया आयुक्तांच्या नियंत्रणाखाली होणार आहे. कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीबाबत शिक्षणाधिकाऱ्यांबरोबर करारनामा करावा लागणार आहे.