55 ठिकाणी स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीची गरज
वर्धा : नवीन शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून (दि. 23) सुरूवात होत आहे. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांचे शाळेत जल्लोषात स्वागत करण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने तयारीही करण्यात आली आहे. काही शाळांत लोकप्रतिनिधी तर काही शाळांत शासकीय अधिकारी विद्यार्थ्यांचे स्वागत करणार असले तरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 82 शाळांत स्वच्छतागृह नसल्याचे आणि 55 शाळांमधील स्वच्छतागृहांना दुरुस्तीची गरज असल्याचे वास्तव आहे.
सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी खुद्द पालकमंत्री तथा राज्याचे शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर नजीकच्या साटोडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उपस्थित राहून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. जिल्ह्यात प्रथमच शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण राज्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या 82 शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी साधे स्वच्छतागृह नाही. तर ज्या शाळांत स्वच्छतागृह आहे त्यापैकी 55 शाळांतील स्वच्छतागृहांची दैनावस्था झाली असून त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी ही स्वच्छतागृह दुरुस्त न झाल्यास विद्यार्थ्यांना गैरसोयीलाच सामोरे जावे लागणार आहे.
126 शाळांना सुरक्षा भिंत नाही
एकीकडे पाल्याचा प्रवेश कॉन्व्हेंटमध्ये करून घेण्याकडे पालकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. शाळा परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शाळेला सुरक्षा भिंत, शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असणे गरजेचे ठरते. पण जिल्ह्यातील तब्बल 126 शाळांना सुरक्षा भिंत नसल्याचे वास्तव आहे. उपाययोजना करण्याची गरज आहे.
केवळ 14 शाळांनी केली जलस्रोतांची तपासणी
डिसेंबर 2024 मध्ये दूषित पाण्यामुळे तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. त्यानंतर शिक्षण व आरोग्य विभागाच्या पुढाकाराने विशेष मोहीम राबवून 554 शाळांतील पाण्याचे नमुने घेत ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. याच तपासणीअंती 78 पाण्याचे नमुने दूषित आढळले होते.