
पुण्यात मद्यपी टोळक्याचा गोंधळ, पोलिस शिपायालाही धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
पुणे : राज्यासह देशभरातील वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या भागात मद्यपी टोळक्याने गोंधळ घालून पोलिस शिपायाला धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. शासकीय कामात अडळा आणणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्य पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिस शिपाई अक्षय डिंडोरे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, पोलिसांनी नाना बापू नाईकनवरे (वय २४), सनी मुकेश नाईकनवरे (वय २२, दोघे रा. एसआरए वसाहत, विमाननगर), दक्षेश विठ्ठल कुरपे (वय २४, रा. सरगम सोसायटी, वारजे जकात नाका), गणेश संजय तुपसैांदर (वय २२, रा. कुंभारवाडा चौक, कसबा पेठ), विकी कारंडे (वय २४, रा. बराटे चाळ, कर्वेनगर), सार्थक कदम यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या भागात कामगार पुतळा परिसरात थांबलेले होते. त्यांनी दारू पिऊन रस्त्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणी मद्यपी टोळके गोंधळ घातल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस शिपाई डिंडोरे तेथे गेले. त्यांनी आरोपींना रस्त्यात गोंधळ घालू नका, असे सांगितले. तेव्हा आरोपींनी डिंडोरे यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा आणणे, धक्काबुक्की करणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्य पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करून ६ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.