वाहतूक विभागातील ‘डिओं'ना दणका; एकाचवेळी तीस पोलीस कर्मचार्यांच्या उचलबांगड्या
पुणे : सातत्याने चर्चेत असणारा पण, काही महिन्यांपासून समाधानकारक कामगिरी करणाऱ्या वाहतूक विभागातील डिओंचा मनमानी कारभार चव्हाट्यांवर आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी डिओंना दणका देत एकाचवेळी तीसही विभागातील या ड्युटी ऑफिसर (डिओ) असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्याचे आदेश दिले. त्यानूसार एकाचवेळी ३० कर्मचाऱ्यांची लष्कर व बंडगार्डन पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. ही बदली तात्पुरती आहे. वाहतूक शाखेचा अतिरीक्त कार्यभार सांभळणारे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी रात्री याबाबतचे आदेश दिले. यानंतर मात्र, पोलीस दलात खळबळ उडाली. दुसरीकडे डिओच्या माध्यमातून मनमानी करणाऱ्यांना देखील चाप बसला आहे.
पुणे शहरात वाहतूक शाखेचे ३० विभाग आहेत. पोलीस ठाण्याप्रमाणे प्रत्येक विभागात एक कर्मचारी ड्युटी ऑफिसर म्हणून काम करतो. त्याच्यावर विभागाच्या सर्व कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी असते. सोबतच कोणत्या कर्मचाऱ्यांना कुठे नेमणूक द्यायची, कोणाला टेम्पो, क्रेनवर ड्युटी द्यायची यासह सुट्टी देखील त्याच्यामार्फतच वरिष्ठांकडे पाठविले जाते. त्यामुळे डिओंचा वेगळाच ‘रूतबा’ असतो. डिओ म्हणून काम करण्यासाठी देखील ‘विशेष’ प्रयत्न करावे लागतात. त्यानंतर डिओपद मिळते. हे पद ‘कलेक्टर’नंतर महत्वाचे मानले जाणारे. त्यामुळे अनेक कर्मचार्यांना येथे काम करण्याची इच्छा असते.
डिओ मनमानी कारभार करतात, मर्जीतल्या लोकांनाच चांगले कर्तव्य देतात, इतर कर्मचार्यांना कर्तव्य देताना दुजाभाव केला जातो, कर्तव्य देताना विशिष्ट उदिष्ट ठेवले जाते, विभागात सुरू असलेल्या कामाच्या परवाने देताना त्यांच्याकडून हेतू ठेवला जातो अशा अनेक तक्रारी आयुक्तांकडे गेल्या होत्या. तक्रारींची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी डिओंची उचलबांगडी केली.
डिओ चे कर्तव्य नको रे बाबा
पोलीस आयुक्तांनी विशेष लक्ष वाहतूक शाखेत देण्यास सुरूवात केल्यानंतर आता डिओंचे पद नको, अशी भावना निर्माण झाली आहे. काही कर्मचारी तर मागील दोन ते तीन महिन्यापासूनच डिओचे कर्तव्य पार पाडत होते. तेही उचलबांगडीत भरडले गेले आहेत. मात्र, आयुक्तांच्या या निर्णयामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
टेम्पो, क्रेनही रडारवर ?
वाहतूक विभागातील आणखी एक महत्वाचे कर्तव्य म्हणजे, टेम्पो आणि क्रेनवर नेमणूक. येथे नेमणूक मिळविण्यासाठी देखील वरिष्ठांची मर्जी मिळवावी लागते. टेम्पोवरील गाड्या उचलणारे कंपनीचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी हेराफेरी करतात, ही बाब देखील वरिष्ठांपर्यत पोहचली आहे. त्यामुळे त्यावर देखील कारवाई लवकरच होणार असल्याचे बोलले जात आहे.