मुंबई – राज्यात होऊ घातलेल्या शिक्षक-पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकांमधील उमेदवारीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत होती. सकाळपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या तर नागपूर शिक्षक मतदारसंघातही अनेक नाट्यमळ वळणे पाहायला मिळाली. नागपूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने गंगाधर नाकाडे यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र गंगाधर नाकाडे यांनी अर्ज मागे घेतला. नागपूरमध्ये भाजपचे वर्तमान आमदार नागो गाणार आणि काँग्रेसच्या सुधाकर आडबोले यांच्यात थेट लढत होईल. मात्र यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांनी आपला अर्ज मागे घेतलाच नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.
नाशिकमध्ये तिहेरी लढत
नागपूर पाठोपाठ नाशिकमध्येही प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. विशेष म्हणजे त्या कालपासून नॉट रिचेबल होत्या. अखेर अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर त्या विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी आपण अर्ज मागे घेतला नसल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं. त्यामुळे या निवडणुकीत सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील अशी दुहेरी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (१६ जानेवारी) सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यानंतर आता नाशिक पदवीधर मतदारसंघात एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली. रतन कचरु बनसोडे, नाशिक वंचित बहुजन आघाडी, सुरेश भिमराव पवार, नाशिक नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी, अनिल शांताराम तेजा, अपक्ष, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर,धुळे अपक्ष, अविनाश महादू माळी, नंदूरबार अपक्ष, इरफान मो इसहाक, मालेगाव जि.नाशिक अपक्ष, ईश्वर उखा पाटील,धुळे अपक्ष, बाळासाहेब रामनाथ घोरपडे, नाशिक, अपक्ष, ॲड. जुबेर नासिर शेख,धुळे अपक्ष, ॲड.सुभाष राजाराम जंगले,श्रीरामपुर, अपक्ष, सत्यजित सुधीर तांबे,संगमनेर, अपक्ष, नितीन नारायण सरोदे, नाशिक अपक्ष, पोपट सिताराम बनकर, अहमदनगर, अपक्ष, शुभांगी भास्कर पाटील,धुळे अपक्ष, सुभाष निवृत्ती चिंधे, अहमदनगर, अपक्ष, संजय एकनाथ माळी,जळगाव,अपक्ष असे एकूण १६ उमेदवार निवडणुक लढविणार आहेत.
सतीश इटकेलवार निलंबीत
नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सतीश इटकेलवार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण महाविकास आघाडीकडून या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराला अधिकृत पाठिंबा देण्यात आलाय. त्यामुळे सतीश इटकेलवार यांना अर्ज मागे घेण्याची सूचना करण्यात आली होती. पण इचकेलवार यांनी अर्ज मागे घेतला नाही. याउलट ते नॉट रिचेबल झाले. त्यामुळे त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली.
नागपुरात तिहेरी लढत
नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे हे सुद्धा उमेदवार आहेत. त्यांनीदेखील अर्ज मागे घेतलेला नाही. तिसरे म्हणजे सुधाकर अडबाले यांनी देखील अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीत सतीश इटकेलवार, राजेंद्र झाडे आणि सुधाकर अडबाले यांच्यात तिहेरी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
नागपूरची उमेदवारी मागे घेतली
नागपूर शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नाकाडे होते. त्यांची उमेदवारी मागे घ्यायला सांगितली. महाविकास आघाडीसंदर्भात निर्णय घ्यायचा असेल तर सगळ्यांनी एकत्रित लढलं पाहिजे. त्यामुळं आम्ही नागपूरची उमेदवारी मागे घेतली. काँग्रेसच्या आडमुले या उमेदवाराच्या मागे ठाकरे गटाची शिवसेना उभी राहील. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या निर्णयाबाबत विस्कळीतपणा दिसला. यापुढच्या निवडणुकीत अधिक काळजीपूर्वक पाऊल टाकली पाहिजे. अशाप्रकारचे घोळ आणि गोंधळ होता कामा नये. हा धडा महाविकास आघाडीच्या घटकपक्षातून घेतला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ कुणामध्ये लढत?
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण 27 अर्ज आले होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी आज उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता 22 उमेदवार रिंगणात आहे…
त्यापैकी सर्वात महत्त्वाचे चार उमेदवार म्हणजे
1) नागो गाणार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार… भाजपचा त्यांना पाठिंबा…
2) सुधाकर अडबाले, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार… ( हे काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांची पसंती असल्याचे बोलले जात आहे.. मात्र काँग्रेसने अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही…)
3) राजेंद्र झाडे, कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीचे उमेदवार ( यांनीही काँग्रेसचा पाठिंबा मागितला होता.. मात्र काँग्रेस नेत्यांकडून आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे)
4) सतीश इटकेलवार, राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भ ओबीसी सेलचे अध्यक्ष आहेत. यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म मिळालेला नाही.
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आठ उमेदवार रिंगणात
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत दि. 13 जानेवारी ते दि.16 जानेवारी 2023 या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत आज दुपारी 3.00 वाजेपर्यंत एकूण 13 उमेदवारी अर्जांपैकी 5 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीच्या जाहिर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार 5 जानेवारी ते 12 जानेवारी 2023 या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या कालावधीत छाननी दरम्यान एकूण 13 उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरवून स्विकृत करण्यात आले होते. त्यापैकी 1) कडू वेणुनाथ विष्णु, अपक्ष 2) घोन्साल्वीस जिमी मतेस, अपक्ष 3) बळीराम परशुराम म्हात्रे, अपक्ष 4) बाळाराम गणपत पाटील, अपक्ष, 5) ज्ञानेश्वर पुंडलिक म्हात्रे, अपक्ष, या पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज जागे घेतले आहेत.
म्हात्रे ज्ञानेश्वर बारकु, भारतीय जनता पार्टी, 2) धनाजी नानासाहेब पाटील, जनता दल (युनायटेड ), 3) उस्मान इब्राहिम रोहेकर, अपक्ष, 4) तुषार वसंतराव भालेराव,अपक्ष, 5) देवरुखकर रमेश नामदेव, अपक्ष 6) बाळाराम दत्तात्रेय पाटील, अपक्ष, 7) प्रा.सोनवणे राजेश संभाजी, अपक्ष, 8) संतोष मोतीराम डामसे, अपक्ष असे आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान सोमवार दि. 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत या वेळेत होणार आहे.
औरंगाबादमध्ये 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात –
निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी एकुण 15 उमेदवारांचे 30 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले होते. नामनिर्देशनपत्र छाननी नंतर सर्व 15 उमेदवारांचे नामनिर्देशपत्र वैध ठरले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 15 उमेदवारांपैकी 01 उमेदवाराने उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे विरुद्ध भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Marathwada Teacher Constituency Election) दाखल करण्यात आलेल्या अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असताना देखील, राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला अखेर बंडखोरीचा ग्रहण लागल्याचे पाहायला मिळाले.
आता या पाचही मतदारसंघात ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी २ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आता २ फेब्रुवारी रोजी कळेल.