
पुणे : भोर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्या निर्णय घेतला आहे. उद्या (२२ एप्रिल) ते मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील. पण संग्राम थोपटे यांच्या पक्षप्रवेशापूर्वीच स्थानिक पातळीवरू त्यांच्या प्रवेशाला विरोध होऊ लागला आहे. थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या घोषणेनंतर स्थानिक स्तरावरील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही नाराजी आता उघडपणे व्यक्त केली जात आहे.
मुळशी तालुक्याचे भाजपच्या सरचिटणीस दत्तात्रय जाधव यांनी थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. “निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून येणाऱ्या नेत्यांना पक्षात सामावून घेतले जात आहे, जे योग्य नाही,” असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
अश्विनी बिद्रेंच्या कुटुंबाला मिळाला न्याय, मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा,
“आयुष्यभर ज्यांचा तिरस्कार केला ते उद्या आपल्या सोबत येणार याचं विशेष आश्चर्य वाटलं. जुन्या जाणत्या वडीलधाऱ्या लोकांची एक म्हण आठवली की, घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की घरातल्या लोकांनाच बाहेर झोपावं लागतं,” अशा शब्दांत दत्तात्रय जाधव यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, संग्राम थोपटे हे येत्या २२ एप्रिल रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्यानंतरच दत्तात्रय जाधव यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. भोर मतदारसंघात ही नाराजी वेळेत हाताळली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी चर्चाही सुरू झाली आहे.