पुण्यात नदी पात्रात तीन व्यावसायिकांचा मृत्यू
पुणे : पुण्यामध्ये पावसाच्या पाण्यामुळे मोठे नुकसान होत आहे. शहरामध्ये नदीला पूरसदृश्य पाणी आले असून यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीलगत राहणाऱ्या लोकांना देखील घर सोडण्याचे सूचना देण्यात आल्य़ा आहेत. वस्त्यांमध्ये पाणी आले असून पुराच्या पाण्यामुळे शहरामध्ये पहिली दुर्घटना घडली आहे. पुलाची वाडी या परिसरामध्ये तीन पथारी व्यावसायिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मुठा नदीमध्ये खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. तसेच शहराला रेड अलर्ट देण्यात आला असून पावसाचा जोर कायम आहे. खडकवासला धरणातून पहाटे 4 वाजता 40,000 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीचे पात्र वाढले आहे. यामध्ये भिडे पूल देखील पाण्याखाली गेला आहे. नदीचे पात्र वाढल्यामुळे नदीच्या पात्रामध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा त्रास झाला आहे. आज पहाटे तीन वाजता भिडे ब्रिज परिसरामध्ये अपघात घडला असून यामध्ये तीन पथ विक्रेत्यांचा मृत्यू झाला आहे.
तरुण विक्रेत्यांचा मृत्यू
आज (दि.25) पहाटे तीन वाजता भिडे ब्रिज परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. झेड ब्रिज खाली देखील पाणी आल्यामुळे पुलाखाली गाडी लावणाऱ्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली आहे. झेड ब्रिजखालील अंडा भुर्जी स्टॉल येथे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने पाणी आले. अंडा भुर्जी येथे काम करणारे तीन इसम अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले असता त्यांना विजेचा शॉक लागला. यामुळे त्यांना तातडीने सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले होते. मात्र दुर्दैवाने या तिन्हीही इसमांना डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या विक्रेत्यांमध्ये नेपाळी कामगाराचा देखील समावेश आहे. अभिषेक अजय घाणेकर (वय 25 वर्ष) आकाश विनायक माने (वय 21 वर्ष) दोघेही राहणार पुलाच्या वाडी डेक्कन असे यामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहे. तर तिसरा कामगार हा नेपाळी कामगार आहे. शिवा जिदबहादुर परिहार (वय १८ वर्ष) असे या नेपाळी कामगाराचे नाव आहे.