टेंभूर्णी : माढा तालुक्याच्या उत्तर भागात गुरुवारी रोजी रात्री ढगफुटी सदृष्य पावसाने हाहाकार केला असून सर्वत्र ओढे नाले खळखळून वाहू लागले आहेत. यामुळे बेंद ओढ्याने (विठ्ठलगंगा ) पुराची पातळी ओलांडून कुर्डूवाडी शहराला पुराने वेढा टाकला असून टेंभुर्णी, माढा व पंढरपूरला जाणारी बससेवा बंद करण्यात आली आहे. तर लातूर – सातारा महामार्गावरील टेंभुर्णी कुर्डवाडी दरम्यान रस्त्यावर पाणी आले असल्यामुळे पहाटेपासून वाहतुक बंद झाली आहे. एकंदरीत परिसराला पावसाने झोडपून काढले असून केळी, द्राक्षे, मका, ऊस, यासह हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.
हवामान खात्याने ६ आक्टोंबर पासून मुसळधार पाऊस पडण्याचा वर्तवलेला अंदाज खरा ठरला असून माढा तालुक्याच्या उत्तर भागातील निमगाव, बादलेवाडी, उपळवाटे, शेडशिंगे, जागले भोगेवाडी, ढवळस पिंपळखुंटे, आदी गावांमध्ये गुरूवारी रात्री ढगफुटीसदृष्य पावसाने हाहाकार केला आहे. यामुळे मराठवाड्याला जोडणारा लातूर सातारा महामार्गावर विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याजवळील बनाच्या ओढ्यात रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतुक बंद करण्यात आली आहे.
तसेच कुर्डूवाडी शहरातून वाहणाऱ्या बेंद ओढ्याला पूर आल्याने टेंभुर्णी रोड, पंढरपूर रोड, माढा रोड बस स्थानक परिसर आगार परिसर चौधरी वसाहत, बायपास, स्मशानभूमी या परिसरातील घरामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात संसार उपयोगी वस्तूचे नुकसान झाले आहे. तर अनेक कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. तर असा पाऊस मागील वीस वर्षांत झाला नसल्याचे नागरीक सांगत आहेत.
दिनांक ६ रोजी माढा तालुका मंडळ निहाय पाऊस
माढा : २३.२ मी. मी
कुर्डुवाडी : ४४.६ मी. मी
टेंभुर्णी : ३६ मी. मी
रांझनी : ६० मी. मी
दारफळ : १९. ३ मी. मी
म्हैसगाव : ४९.२ मी. मी
रोपळे: ५९. ३ मी. मी
लऊळ : २७. ८ मी. मी
मोडनिंब: ५३. ३ मी. मी