शिरोळ तालुक्यात रस्ते मार्गावरील वाहतूक ठप्प
शिरोळ : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कृष्णा, दूधगंगा, पंचगंगा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तीन बंधारे पाण्याखाली गेले असून, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
शिरोळ, राजापूर तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा जोडणारा दत्तवाड-एकसंबा बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. तर कनवाड-म्हैशाळ हा बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या ४ मार्गावरील वाहतूक ठप्प असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या तेरवाड बंधाऱ्याची पाणीपातळी ३७ फूट ८ इंच, शिरोळ बंधारा ३३.८ इंच, दिनकरराव यादव पूल ३२.६ फूट तर राजापूर बंधारा २२ फूट ९ इंच एवढी आहे. चार दिवसांत पाण्याची पातळी तब्बल पाच फुटांनी वाढली आहे.
हेदेखील वाचा : Monsoon Update : जूनमध्ये हाहाकार माजणार! मान्सून आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडणार, हवामान विभागाचा अंदाज
कर्नाटकातून राज्यात सध्या २२९५० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत असल्याने नद्या धोक्याच्या पातळीवर येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. परिणामी, खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. हवामान विभागाने १ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जून महिन्यात मुसळधार पाऊस
यंदा जून महिन्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सरासरीच्या 108 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यंदा मान्सून मे महिन्यातच दाखल झाला असून १६ वर्षांनंतर अशी परिस्थिती उद्भवली आहे. २०२४ मध्ये भारतात ९३४.८ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर २०२३ मध्ये तो ८२० मिमी पाऊस झाला होता. हा पाऊस सरासरीपेक्षा ९४.४ टक्के अधिक झाला होता.