काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यातील काष्टी आणि सावर्डे ही गावे डोंगराच्या कुशीत वसलेली असून हमरस्त्याशी जोडणारा एकमेव रस्ता सध्या बंद पडला आहे. या रस्त्यावर मोठे झाड बुडासकट कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला असून साधारणपणे एक हजार लोकसंख्या अडचणीत सापडली आहे. दळणवळण थांबल्यामुळे ग्रामस्थांना आवश्यक वस्तू, आरोग्यसेवा तसेच शालेय शिक्षण यांसाठी अडथळे निर्माण झाले आहेत.
Maharashtra Heavy Rain: पुणे, रायगडसह ‘या’ जिल्ह्यांत तुफान पाऊस कोसळणार; कोकणात तर उंचच उंच…
सावर्डे हे गांव मध्यवैतरणा प्रकल्पामुळे वारंवार चर्चेत असते. प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या अनेक समस्यांबरोबरच नैसर्गिक आपत्तीजनक अडचणी येथे कायम राहिल्या आहेत. मुसळधार पाऊस आणि जंगलपट्ट्याजवळ वसलेल्या रस्त्यांमुळे दरवर्षी कधी झाडे कोसळतात, तर कधी दरडी सरकतात. यामुळे ग्रामस्थांना सतत वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पावसाळ्यापूर्वीची आवश्यक कामे जसे की रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे, निचऱ्याची व्यवस्था करणे, तसेच ढासळत्या रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाहीत. परिणामी पावसाळ्यात अगदी थोड्या पावसातही मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबते आणि जनजीवन विस्कळीत होते.
झाड रस्त्यावर पडल्यामुळे काष्टी आणि सावर्डे या दोन गावांचा हमरस्त्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. ग्रामस्थांना सध्या पर्यायी मार्ग नसल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. आजारी रुग्णांना दवाखान्यात नेणे, शालेय विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवणे, तसेच शेतमाल बाजारात नेणे अशा दैनंदिन गोष्टी ठप्प झाल्या आहेत.
स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने झाड हटवण्याची आणि रस्ता सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी नियमितपणे प्रतिबंधात्मक कामे करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. अन्यथा दरवर्षी याच प्रकारे हजारो लोकांना वाहतुकीत अडकून रहावे लागणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.