मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मंगळवारी (दि. 19) रात्रीपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी (दि. 20) दुपारपर्यंत न थांबल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. पाचघर गावालगतच्या पुलावरून पुरासारखे पाणी वाहू लागल्याने पाचघर, करोळ आणि वावळ्याचीवाडी या गावांचा हमरस्त्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरू होत असली तरी संततधार पावसामुळे स्थानिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार; भोगावती नदीला महापूर, लक्ष्मी जलाशय शंभर टक्के भरला
या रस्त्यावर असलेल्या मोरीवरूनही पाण्याचा वेग वाढल्याने संपर्क तुटतो. या तीन गावांतून दररोज कारेगाव आश्रमशाळेत जाणारी सुमारे ५० ते ६० मुले-मुलींना ७ किमी अंतर पायी चालावे लागते. मात्र पाणी पुलावरून वाहत असताना शाळेत जाणे कठीण होते. आरोग्य सेवा, राशनसारख्या मूलभूत गरजांसाठी देखील ग्रामस्थांना अडचण निर्माण होते. त्यामुळे अधिक उंचीचा पूल बांधावा अशी मागणी अनेक वर्षांपासून ग्रामस्थ व पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ बांधकाम विभागाकडे करत आहेत.
प्रत्येक वर्षी अतिवृष्टीमुळे या गावातील आदिवासी बांधवांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने पूल बांधण्याचे काम रखडले आहे. बांधकाम विभागाकडून “१५ मीटरपेक्षा जास्त काम आमच्या अखत्यारीत नाही” असे कारण पुढे केले जाते, तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून “हे काम नाबार्डमधून प्रस्तावित करू” असे आश्वासन दिले जाते. परिणामी ग्रामस्थांना आश्वासनाचे गाजर दाखवले जाते पण ठोस उपाययोजना होत नाही. दरम्यान, मुसळधार पावसामुळे मरकटवाडी–बेहेटवाडी रस्त्यालगतचा खडा पहाड कोसळून रस्त्यावर पडल्याने हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे.
तसेच मोखाडा तालुक्यातून नाशिक–कसारा महामार्गाला जोडणाऱ्या खोडाळा–विहीगाव मार्गावरील गार नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे काही तास वाहतूक खोळंबली होती. हा पूल सखल भागात असून खांबांना ठिकठिकाणी तडे गेले आहेत. पुलाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने दुरुस्तीची मागणी ग्रामस्थ वारंवार करत आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या आवश्यक पुलाकडे दुर्लक्ष करून इतर ठिकाणी कोटींची कामे हाती घेतल्याचा आरोप माजी सभापती प्रदीप वाघ यांनी केला आहे.
दरवर्षी पुनःपुन्हा निर्माण होणाऱ्या या समस्येमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उंच पूल व दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.