Trupti Desai claims Beed murder case accused Krishna Andhale in nashik as transgender
नाशिक : डिसेंबर महिन्यामध्ये बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामुळे संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. या प्रकरणामध्ये सर्व आरोपींना अटक करुन त्यांच्या मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. नाशिकमध्ये तो असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र हा आरोपी नसल्याचे नाशिक पोलिसांनी सांगितले होते. यानंतर आता पुन्हा एकदा कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असून ‘ट्रान्सजेंडर्स’च्या वेशात फिरत असल्याचा गंभीर दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे.
तृप्ती देसाई यांनी पुन्हा एकदा बीड हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये वेशांतर करुन फिरत असल्याचा दावा केला आहे. त्या म्हणाल्या की, मंगळवारी मी देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अनेकदा अशी चर्चा होते की आंधळे सध्या नाशिक जिल्ह्यात लपून बसला आहे. अलिकडेच मला एका फोन कॉलद्वारे माहिती मिळाली की तो कर्नाटक सीमेजवळील ‘ट्रान्सजेंडर’ लोकांमध्ये वेशात राहत आहे आणि आपली ओळख लपवत आहे, असा खळबळजनक दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तृप्ती देसाई या आरोप करताना म्हणाल्या की, “अनेक पोलिस अधिकारी अजूनही मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या प्रभावाखाली काम करत आहेत. तो माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी आहे. त्याने पोलिसांवर खंडणीसह बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी असल्याचा खळबळजनक आरोप केला. देसाई यांनी मंगळवारी सांगितले की, मी या अनियमिततेत सहभागी असलेल्या २६ कर्मचाऱ्यांची यादी सादर केली आहे. काल त्यांनी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात सर्व उपलब्ध तपशील आणि पुरावे सादर केले,” असे तृप्ती देसाई यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मागणी
बीड जिल्ह्यात १० वर्षांहून अधिक काळ तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मागणीही तृप्ती देसाई यांनी केली. यासोबतच देसाई यांनी एफआयआरमध्ये छेडछाड केल्याचा दावा केला आणि असे करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच देशमुख यांचे गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी अपहरण, छळ आणि हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे, तर आंधळे अद्याप पकडले गेलेले नाहीत. तथापि, त्याला पकडणे इतके अवघड नाही.
महाराष्ट्रातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या नागपूर हिंसाचार प्रकरणाला तृप्ती देसाई यांनी धक्कादायक घटना असल्याचे सांगितले आहे. त्या म्हणाल्या की, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू न देता सरकारने औरंगजेबाच्या थडग्याच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घ्यावी. सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. ईद आणि गुढीपाडव्याच्या आधी फुटीरतावादी विधानांना आळा घालायला हवा आणि नेत्यांनी प्रक्षोभक विधाने करण्यापासून परावृत्त करावे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. देशमुख यांच्या हत्येपासून आणि महिलांवरील गुन्ह्यांपासून लक्ष विचलित करण्याचा हा एक अयशस्वी प्रयत्न आहे, असा घणाघात तृप्ती देसाई यांनी सरकारवर केला आहे.