नागपुरात शॉर्टसर्किट होऊन दोन ट्रक जळाले; आगीवरील नियंत्रणासाठी दीड तास प्रयत्न
नागपूर : सध्या उन्हाचा कडाका वाढताना दिसत आहे. याच उन्हामुळे अनेक ठिकाणी आगीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यात आता नागपूरमध्ये जवळपास दररोजच आगीच्या घटना पुढे येत आहेत. घर, दुकान, कचऱ्याच्या ढिगाऱ्यांसोबतच वाहनांमध्येही आग लागत आहे. असे असताना आता दोन उभ्या ट्रकना अचानक आग लागली. पाहता-पाहता दोन्ही ट्रक जळून खाक झाले.
ऑटोमोटिव्ह चौकात सायोना शाळेजवळ कामठी रोडवर 14 चाकी आणि 12 चाकी ट्रक उभा होता. रविवारी पहाटे 4.05 वाजताच्या सुमारास एका ट्रकमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आग पसरून जवळ उभ्या दुसऱ्या ट्रकपर्यंत पोहोचली. त्यानंतर जवळच असलेले टिनाचे शेड आणि लाकडांच्या ढिगालाही कवेत घेतले. या घटनेने एकच खळबळ उडाली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सुगतनगर केंद्रातून अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. तोपर्यंत आग चांगलीच पसरली होती. सिव्हिल लाईन्स केंद्रातूनही एक वाहन मागविण्यात आले. तत्काळ पाण्याचा मारा करून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. जवळपास दीड तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत दोन्ही ट्रक आगीत जळून खाक झाले होते.
अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी
माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. दीड तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळाले. मात्र, तोपर्यंत दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने यावेळी ट्रकमध्ये कोणीही नव्हते. अन्यथा मोठी घटना घडण्याची शक्यता होती.
मुंबईतही लागली होती आग
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील लोखंडवाला परिसरातील एका इमारतीला शनिवारी (दि.26) सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. या दुर्दैवी आगीच्या घटनेत एका ३४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसेच 6 जण जखमी झाल्याची ही माहिती मिळत आहे. या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.