
'आज पाऊल उचललं, उद्या हात उचलणार'; मुंबईत महामोर्चातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी मुंबईत एकत्र रस्त्यावर उतरले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात त्यांनी या संयुक्त मोर्चाचे नेतृत्व केले आहे. निवडणूक प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचा आरोप करत त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगच्या आयुक्तांच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे. राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होते, मग निवडणूक आयुक्तांची का नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. भारत देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा नाही, असं म्हणत ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आज पाऊल उचललं, उद्या हात उचलणार, असाही इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे. यामध्ये बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेते उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘तुमचे सर्वांचे आभार मानतो. जनसागर उसळला आहे. त्यांचे आभार मानतो. हा लढा जातीपाती, धर्माचा नाही, तर हा लढा आपल्या स्वातंत्र्याचा लढा आहे. मला आठवत आहे. मोदी निवडून आले, त्यावेळी त्यांनी मेक इन इंडियाची घोषणा केली होती. परंतु आता मेक इन इंडियात हुकूमशहा तयार होत असेल, त्यांना गाडण्यासाठी आम्ही उभे ठाकलो आहोत. बाकी सर्व ठीक आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून हुकूमशहा होत असाल, तर गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही.
कोर्टात प्रकरण गेल्यावर तारीख पे तारीख सुरू
एसआयआर हा गैरकायदा आहे.. नागरिकत्व रद्द करण्याचा अधिकार ज्ञानेश कुमार यांच्या बापाचा नाही. म्हणजे अमित शहा यांचा… अमित शहा हे ज्ञानेश कुमारांच्या माध्यमातून हा अधिकार वापरत आहे. सर्वत्र मतदार वगळले जात आहे’. असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. संपूर्ण देशात 13 कोटी मतदार वगळले आहेत. महाराष्ट्रातील मतदारांची संख्या वगळून टाकली आहे. बंगाल, तामिळनाडूत मतदार वगळले आहे. बंगालमध्ये वगळले, त्यातील काही वैध झाले. आता तिथे पोटनिवडणूक आहे. त्यांना अधिकार मिळावा म्हणून सुप्रीम कोर्टात गेले. 6 तारखेला निवडणूक आहे. तर सुप्रीम कोर्टाने 5 तारखेला सुनावणी घ्यायचं ठरवलं. खरंतर त्यांनी सर्व संस्था ताब्यात घेतल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या आयुक्ताची निवडणूक का होत नाही, त्यांची नेमणूक का होते. कमिटीत आधी सरन्यायाधीश, पंतप्रधान, विरोधीपक्ष नेते होते. आता त्याच्यातून सरन्यायाधीश काढून टाकले. आता कमिटीत अमित शहांना टाकलं. यावर राहुल गांधींनी आक्षेप घेतला. पुढे अमित शहांनी ज्ञानेश कुमार यांना नेमलं. आता कोर्टात प्रकरण गेल्यावर तारीख पे तारीख सुरू आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.