५ जुलैचा मोर्चा नाही ‘विजय सभा’ होणार; उद्धव ठाकरे
महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये प्रथम इयत्तेपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा घेतलेला निर्णय अखेर मागे घेतला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ५ जुलै रोजी शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नियोजित विरोध मोर्चाचं आता विजय मोर्चात रूपांतर होणार आहे. वियजी मोर्चा काढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
ठाकरेंनी हा निर्णय ही जनतेच्या एकजुटीची आणि सक्तीच्या विरोधातील लढ्याचा मोठा विजय असं म्हटलं आहे. “मराठी माणूस एकवटला की सरकारलाही झुकावं लागतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं,” असं सांगत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “भाजपचा खरा हेतू मराठी-अमराठी वाद निर्माण करून अमराठी मतांचं राजकारण करणं होता, पण जनतेने परिपक्वता दाखवून ही खेळी उधळून लावली,” अशी टीका त्यांनी केली.
राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर अनेकांच्या मनात ५ जुलैच्या मोर्च्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “हा मोर्चा रद्द होणार नाही, कारण ही केवळ मागणी नव्हती, तर सक्तीविरोधातील आवाज होता. मात्र आता तो विरोधाचा नव्हे, तर विजयाचा मोर्चा असेल. ही विजय सभा मराठी अस्मिता आणि लोकशक्तीच्या ताकदीचा सण असेल.”
सरकारने शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असली, तरी उद्धव ठाकरेंनी या समितीवरही टीका केली आहे. “समित्या कितीही स्थापन करा, सक्तीचा मार्ग यापुढे चालणार नाही. जनतेने त्याविरोधात ठाम भूमिका घेतली आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच, ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी थेट संपर्क झाला नसल्याचं सांगितलं, मात्र पक्षपातळीवर चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. “हा कार्यक्रम आता एकजुटीचं आणि सजगतेचं प्रतीक असेल. संकट येईपर्यंत वाट बघायची गरज नाही. आपण सतत जागरूक राहायला हवं,” असं आवाहन करत त्यांनी सर्व मराठीप्रेमींना ५ जुलैच्या विजय सभेत सामील होण्याचे आवाहन केले आहे.
सरकारने मागे घेतलेला निर्णय हा जनआंदोलनाच्या दबावामुळे घेतलेला असल्याचा पुनरुच्चार करत, भाजपवर अफवा पसरवण्याचा आरोपही त्यांनी केला. “भाजप म्हणजे अफवांची फॅक्टरी झाली आहे. खोट्या गोष्टी पसरवून लोकांना गोंधळात टाकून सत्तेचा मार्ग मोकळा करण्याचं काम ते सातत्याने करत आहेत. पण यावेळी मराठी जनतेने त्यांना थेट उत्तर दिलं आहे,” असं ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. ५ जुलैच्या विजय सभेची अधिकृत माहिती आणि कार्यक्रम स्थळ लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.