ठाकरे बंधूंच्या मोर्चोला मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही; राजकीय वातावरण तापणार
राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याविरोधात ठाकरे बंधुंनी ५ जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र अद्याप मुंबई पोलिसांकडून मोर्चाला परवानगी मिळालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर आज मनसे नेते आणि मुंबई पोलीस यांच्यात काल (28 जून) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान मनसेने मोर्चासाठी अधिकृत परवानगीसाठी अर्ज सादर केला. मात्र, अद्याप पोलिस प्रशासनाने भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मोर्चा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच काढावा लागेल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. उच्च न्यायालयाने आझाद मैदान वगळता अन्य सार्वजनिक ठिकाणी मोर्चा किंवा आंदोलन करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे प्रस्तावित मोर्चाही या अटींच्या चौकटीतच आयोजित केला जावा, असं पोलिसांनी सूचवलं आहे. शिवाय अधिवेशन सुरू असल्यामुळे यावर अंतिम निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून घेण्यात येईल, असंही पोलिसांनी कळवलं आहे.
दरम्यान, राज्य सरकारने पहिली ते चौथीच्या वर्गांमध्ये हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवणे बंधनकारक केले आहे. यावरून मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, या निर्णयाच्या विरोधात येत्या 5 जुलै रोजी संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे 2006 नंतर पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र रस्त्यावर उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या पार्श्वभूमीवर मनसेने मोर्चाबाबत पोलिसांना आपली पूर्वतयारी सादर केली आहे. मोर्चा कोणत्या मार्गाने आणि कशा प्रकारे निघू शकतो, याविषयी पोलिसांनी माहिती घेतली असून अंतिम निर्णय लवकरच देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
मोर्चाच्या तयारीसाठी मनसेत बैठकींचं सत्र सुरू झालं आहे. दक्षिण मध्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक राजगड येथे सुरू असून, यामध्ये मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, माजी आमदार नितीन सरदेसाई आणि यशवंत किल्लेदार सहभागी झाले आहेत. दुसरीकडे, दक्षिण मुंबईतील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडणार असून, बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनसे नेते बाळा नांदगावकर असणार आहेत.