Shiv Sena leader Rajan Salvi left Thackeray group and join shinde group
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्षबदल केले. निवडणुकीनंतर देखील नेत्यांचे नाराजी नाट्य सुरु आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न मिळाल्यामुळे अनेक जेष्ठ नेते नाराज आहेत. त्याचबरोबर हार जिव्हारी लागल्यामुळे महाविकास आघाडीमधील नेते देखील नाराज आहे. निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी झालेली ही अवस्था उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढवत आहे. दरम्यान, राजन साळवी हे देखील नाराज असून त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
शिवसेना ठाकरे गटामध्ये महत्त्वपूर्ण नेते राजन साळवी हे नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. राजन साळवी हे भाजपच्या वाटेवर असलेल्या चर्चांनी देखील जोर धरला होता. यानंतर राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व चर्चांना पूर्णविराम लावला होता. ‘मी नाराज असल्याच्या चर्चा आहेत, मात्र, पण तसं काही नाही’, असं स्पष्टीकरण राजन साळवी यांनी दिलं होतं. मात्र यानंतर आता पुन्हा एकदा राजन साळवी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काय म्हणाले राजन साळवी?
ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून माझ्या प्रवेशासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मला कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण यावं आणि संवाद साधावा. मी काल राजापूर या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा सर्वांनी भावना व्यक्त केल्या की माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्या पराभवाला अनेक मंडळी कारणीभूत आहेत. तसेच तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यांना मी देखील सांगितलं की, मी योग्यवेळी योग्य निर्णय घेईन. तसेच आज लांजा येथील पदाधिकाऱ्यांनी मला बोलावलं होतं. मी या ठिकाणीही आलो कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माझ्या भावना मी त्यांच्याबरोबर व्यक्त केल्या. यावेळी निश्चितच भविष्यात योग्यवेळी योग्य तो निर्णय घेईन असं मी त्यांना सांगितलं आहे”, असं राजन साळवी यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे राजन साळवी म्हणाले की, “माझ्या पराभवाला काही वरिष्ठ मंडळी कारणीभूत आहेत. मी आज त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. मात्र, कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे. आज पक्षावर आणि माझ्यावरही दु:खाचा डोंगर आला. यासाठी कोण कारणीभूत आहे हे शोधणं गरजेचं आहे. जर शोधलं नाही तर आता माझ्यावर जी वेळ आली, तीच वेळ भविष्यात आणखी कोणावर येऊ शकते. मात्र, अशी वेळ येऊ नये, यासाठी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि मी योग्यवेळी योग्य निर्णय घ्यायला सक्षम आहे. माझ्या मतदारसंघातील अनेकांनी मला सांगितलं की तुम्ही योग्य निर्णय घ्या आम्ही तुमच्याबरोबर आहोत”, असे मत राजन साळवी यांनी व्यक्त केले.