Photo Creidt- Social Media
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला मुद्दा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. महायुतीच्या सर्व नेत्यांनी या योजनेचा वापर करुन जोरदार प्रचार केला. या अंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येकी दीड हजार रुपये खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. निवडणुकीमध्ये ही रक्कम 2100 रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यातून पैसे परत घेण्यास सरकारने सुरुवात केली आहे.
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाची ठरली. या योजनेच्या जोरावर महायुतीला न भतो न भविष्यती असे मताधिक्य मिळाले. महायुतीच्या तिन्ही भावांना लाडक्या बहिणींनी मतदानरुपी आशिर्वाद दिले. महायुतीचे पुन्हा एकदा राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. त्यानंतर मात्र लाडक्या बहीण दोडक्या झाल्या आहेत. या योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यातील पैसे पुन्हा एकदा सरकारजमा होऊ लागले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अजित पवार यांनी 2024-25 वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्यावेळी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही प्रलोभन दाखवण्यासाठी योजना जाहीर करण्यात आल्याची टीका करण्यात आली. महिलांचा वाढता प्रतिसादामुळे ही योजना अल्पावधीमध्ये लोकप्रिय झाली. तसेच अर्ज दाखल केलेल्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले. निवडणुकीच्या पूर्वी प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पाच हप्ते अर्थात साडेसात हजार रुपये जमा झाले होते. निवडणुकीनंतर पात्र महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहे. मात्र त्याचबरोबर या योजनेमध्ये अपात्र ठरणाऱ्या महिलांची छाननी सुरु झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार सध्या आहे.
जिल्ह्यातील महिलेचे पैसे घेतले परत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा आढावा घेतल्यावर अर्जांची पडताळणी करण्यात येईल, अशी घोषणा महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केली होती. तसेच त्यांनी या योजनेमध्ये कोणत्या महिला या अपात्र असणार आहे याची सुद्धा माहिती दिल होती. दरम्यान, धुळ्यातील एक महिलेचे पैसे परत घेण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, धुळ्यातील नकाने गावातील एका महिलेचे 7500 रुपये परत घेण्यात आले आहेत. धुळ्यातील या महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत आढळले, त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिला आत्तापर्यंत देण्यात आलेले 5 महिन्यांचे साडेसात हजार रुपये परत घेण्यात आले असून ते सरकारजमा करण्यात आले.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यभरामध्ये आता मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची पडताळणी आणि अपात्र महिलांची छाननी करण्यास सुरुवात झाली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 5 लाख 14 हजार अर्ज भरण्यात आले होते. त्यापैकी सुमारे 4 लाख 90 हजार महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. आता पडताळणीमध्ये त्याच दरम्यान नकाने गावातील एका महिलेने या योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे समोर आल्याने तिचे 7 हजार 500 रुपये परत घेण्यात आले. मात्र हे प्रकरण पूर्वीचं असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री अदिती तटकरे काय प्रतिक्रिया देणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.