शरद पवार, छगन भुजबळ एकाच मंचावर, हास्यसंवाद, चर्चा अन् बरचं काही
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मागील काही दिवसांपासून आपल्याच पक्षावर नाराज आहेत. महायुतीच्या मंत्रिमंडळात संधी न दिल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यावरुन ते देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले. त्यांच्यात चर्चाही झाली. मंत्रिपद न दिल्याने नाराज भुजबळ पुढे कोणता निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यातंच त्यांची एका सोहळ्यात शरद पवार, छगन भुजबळ एकाच मंचावर आले. मात्र काही वेळानंतर पवार आणि भुजबळ यांच्यात काही सेकंदांचा संवाद झाला. मंचावर ते एकमेकांकडे पाहून हसू लागले. या प्रसंगावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात पुतळ्यांचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार होते, तर छगन भुजबळांकडे सोहळ्याचे अध्यक्षपद देण्यात आले होते. तेव्हा दोघेही सोहळ्याला उपस्थित राहणार हे नक्की होते. यामुळे नाराजी प्रकरणानंतर शरद पवार आणि छगन भुजबळ समोरासमोर येणार होते.
अनावरण सोहळ्याला चारच्या सुमारास शरद पवार यांनी हजेरी लावली. भुजबळाच्या आधीच ते येऊन बसले. पुढे दीड तासाने छगन भुजबळ सोहळ्याला पोहोचले. वेळेला महत्व देणाऱ्या पवारांना साहजिकच थोडा का होईना राग आला असेल याची कल्पना भुजबळांना होतीच. त्यामुळे मंचावर आल्यापासून भुजबळांनीही बोलणे टाळले. थोड्या वेळात शरद पवारांनी पुढाकार घेत भुजबळांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
एकाच मंचावर आल्यानंतर सुरुवातीला शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात संवाद झाला नाही. पुढे पवारांनी त्याच्या हातातील पत्रिकेवर दोन ओळींचा मजकूर लिहिला आणि आपल्या हातातली पत्रिका भुजबळाच्या हाती सोपवली. मग त्यांनी भुजबळांना खुणावले. त्यानंतर वीस मिनिटांनी त्यांच्यात काही सेकंदांचा संवाद झाला. ते एकमेकांना पाहून हसले. मंचावर सुरु असलेला प्रसंग पाहून चर्चांना उधाण आले असल्याचे म्हटले जात आहे.
‘वाक़िफ़ कहाँ ज़माना हमारी उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से’, अशी शायरी छगन भुजबळ यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात नायगावमध्ये सावित्रीबाईच्या मूळगावी आयोजित एका कार्यक्रमात बोलून दाखवली. त्याच्या या शायरीतही मंत्रिमंडळातून डावलल्याचा नाराजीचा सूर होता. दरम्यान त्यांच्या या शायरीला मुख्यंमत्री देवेंद्र फडवीस यांनीही प्रतिसाद देत ‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया’ असं एकप्रकारे उत्तर दिलं आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. मंत्रिमंडळात जागा न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी जाहीरपणे आपल्या भावना मांडल्या. ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला त्यांच्या बंगल्यावरही पोहोचले होते. आता एका कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा भुजबळ आणि फडणवीस एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे.