मुंबई : ‘ज्यांना जायचे तर आता जा पण आत राहून दगाबाजीकरू नका. मी आणि माझे जितके शिवसैनिक राहतील त्यांना घेऊन मी लढेन आणि जिंकून दाखवीन. पैसै मिळतायेत म्हणून जायचे असेल तर जा पण आपल्या आईशी गद्दारी करू नका. बघु ना मी याच आशेने उभा आहे. काल अनिल देशमुखांनी सांगितले मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी फडणवीसांनी डाव आखले होते. सगळं सहन करून मी जिद्दीने उभा राहिलो आता एकतर तू तरी राहशील किंवा मी तरी राहिलं. माझे मोदींना आव्हान आहे तुम्ही याच महाराष्ट्रात प्रचारासाठी, या विधानसभेत उरलीसुरली गुर्मीही उतरवतो ,’ अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले आव्हान दिले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मुंबईतील रंगशादरा सभागृहात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस- पवार सरकारवर निशाणा साधला आहे. सभाहगृहात उपस्थितांना संबोधत उद्धव ठाकरे म्हणाले, ” माझ्याकडे, पक्ष नाही, चिन्ह नाही पण तरीही मी उभा आहे ते म्हणजे तुमच्या ताकदीवर, तुमच्या भरोवशावर. मी म्हणजे मी नाही मी म्हणजे तुम्ही आहात. मोदींच्या छातीत धडकी भरलीये ती उद्धव ठाकरेमुळे नाही तर तुमच्यामुळे.
सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल तो लागेल पण आता मशालीचा घरोघरी प्रचार करा. अनेक ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये या चोर कंपनीने शिवसेना प्रमुखांचा फोटो आणि धनुष्यबाण लावून प्रचार केला. लोकांमध्ये चिन्हाबाबत संभ्रम आहे तो दूर करा. लोकांच्या मनात राग आहे. आपल्यासोबत खूप लोक आले आहे. मुस्लीम, ख्रिश्चन लोकही आपल्यासोबत आले आहेत.
एकतर आपण नडत नाही आणि नडलो तर असा नडलो की मोदींनाही घाम फुटला. माझी अपेक्षा होती की मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील निवडणुका शेवटच्या टप्प्यापर्यंत लांबवायला पाहिजे होत्या. म्हणजे उरलेल्या दोन चार कपड्याचेे तुकडेही उतरवले असते,असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.