
महानगरपालिका निवडणुकीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा
जिल्हाप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना चौगुले म्हणाले, शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत विविध स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याच्या सूचना केल्या आहेत. कुणीही आले-गेले तरी शिवसेना मजबूतच आहे. केवळ संघटनेमध्ये मरगळ आली असून, शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चौगुले यांनी स्पष्ट केले. भविष्यात आपण संघटनेतील मरगळ आणि शिवसैनिकांतील संभ्रम दूर करून शिवसेना अधिक सक्षम करु, असंही चौगुले यांनी सांगितले.
सध्या जो शिवसैनिक सक्रिय आहे. त्याला संधी देऊन जो केवळ पद अडवून बसला आहे, त्याला बाजुला सारण्याचाही प्रयत्न केला जाईल. पक्षाच्या शाखेची पुनर्बांधणी करुन पक्षांतर्गत असलेल्या विविध आघाड्यांनाही बळ देण्याचा प्रयत्न करू. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, सुरेश प्रभु आदी नेतेमंडळींना आणून पक्ष अधिक सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे चाैगुले यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष सयाजी चव्हाण, मलकारी लवटे, संतोष गौड, रतन वाझे, शोमा कोलप, शोभा गोरे आदी उपस्थित होते.
३२ इच्छुकांनी मागितली उमेदवारी
दरम्यान आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी ३२ इच्छुकांनी लेखी उमेदवारीची मागणी केली आहे. भविष्यात इच्छुकांची संख्या मोठी असणार असल्याची शक्यता चाैगुले यांनी वर्तवली. उमेदवारी निश्चित करण्यासाठी निवडणूक समन्वय समितीची स्थापना करणार असल्याचे चौगुले यांनी सांगितले.