
बीड : चोरी करण्यासाठी चोरट्यांची टोळी कधी कोणती शक्कल लढवेल हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार बीडच्या केज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उघडकीस आला आहे. चक्क धावत्या ट्रकमधून साहित्याची चोरी करण्यासाठी, अनोखी शक्कल लढवत चोरट्याची टोळी ४ ते ५ पॅन्टचा आधार घेत, सामानाची चोरी करत असत. गेल्या अनेक दिवसांपासून बीडच्या केज तालुक्यातील शिंदी फाटा आणि कोरेगाव दरम्यान, धावत्या वाहनावर चढून धारदार शस्त्राने ताडपत्री फाडून अन्नपदार्थ आणि इतर वस्तूंच्या चोऱ्या होत होत्या.
मात्र, याचा पर्दाफाश आता केज पोलिसांनी केला आहे. केज पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत, केज- बीड महामार्गावरील सावंतवाडी पाटीजवळ असलेल्या टोल नाक्यावर, २ चोरट्यांना सिनेस्टाईल पाठलाग करत पकडले आहे. तर एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे. महादेव कल्याण पवार आणि सुंदर चंदर पवार असे त्या चोरट्यांची नावे आहेत. या २ चोरट्यांची टोळी रात्रीच्या वेळी धावत्या ट्रकवर एकाला १-४ ते ५ पॅन्ट बांधत चढायचे. आणि याच पॅन्टच्या माध्यमातून ते ट्रक मधील साहित्याची चोरी करायचे. यासाठी टायरच्या रबराचा देखील वापर करत होते. ही जीवघेणी अनोखी शक्कल वापरत त्यांनी केज पोलिस ठाण्याच्या हद्दीत चांगलाच धुमाकूळ घातला होता. आणि कोणाच्या हाती देखील लागत नव्हते.
[read_also content=”“स्मार्ट शहरे: स्मार्ट शहरीकरण” मध्ये पिंपरी चिंचवडची सर्वोत्कृष्ठ कामगीरी https://www.navarashtra.com/maharashtra/pimpri-chinchwads-best-performance-in-smart-cities-smart-urbanization-nrdm-271039.html”]
मात्र, केज पोलिसांनी आता कोम्बिंग ऑपरेशन करत, या टोळीचा पर्दाफाश केल्याने ट्रक चालक मालकांनी आता काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात कलम 401, 43 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आजपर्यंत अनेक चोरीच्या घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र, बीडमधील या चोरट्यांची, चोरी करण्याची अनोखी शक्कल सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. चक्क एकाला एक चार ते पाच पॅन्ट बांधून, धावत्या ट्रकमधून सामानाची चोरी करायची आणि कोणाला थांगपत्ता देखील लागत नव्हता. मात्र, आता पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केल्यानं या टोळीला आता लगाम लागणार आहे.