
धनंजय मुंडे यांची पुन्हा मंत्रिपदी वर्णी ?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात महाराष्ट्रातील अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना बीड न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. स्वतःला धनंजय मुंडेंची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा मुंडे यांनी दाखल केलेली फौजदारी तक्रार न्यायालयाने फेटाळली आहे. धनंजय मुंडे यांना दिलासा मिळताच आता त्यांच्या मंत्रिमंडळात ‘कमबॅक’ची चर्चा सुरु झाली आहे.
करुणा मुंडे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या नामांकन पत्रात धनंजय मुंडे यांनी महत्त्वाची माहिती लपवली असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. मात्र, बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला. न्यायिक दंडाधिकारी दीपक बोर्डे यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले की, धनंजय मुंडे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी कोणतीही तथ्ये लपवलेली नाहीत. तसेच कथित लपवलेल्या माहितीचा निवडणूक निकालावर कोणताही परिणाम झालेला नाही.
दरम्यान, न्यायालयाने असेही नमूद केले की, तक्रारदार करुणा मुंडे या आरोपीविरोधात प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांची फौजदारी तक्रार पूर्णपणे फेटाळण्यात आली. ही दिलासादायक बाब अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा धनंजय मुंडे फडणवीस सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
संतोष देशमुख प्रकरणानंतर द्यावा लागला होता राजीनामा
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला जात होता. विरोधकांनीही हा मुद्दा चर्चेचा केला होता. याचदरम्यान धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता करुणा शर्मा-मुंडे प्रकरणावर दिलासा मिळाल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : “धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिलं तर…; अमित शाहांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली तीव्र नाराजी