वनतारा प्रशासन महादेवी हत्तीला परत करणार; पण त्यासाठी...
कोल्हापूर : वनतारा, नांदणी मठ आणि राज्य सरकार या तिघांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. कायदेशीर चौकटीत राहून वनतारा नांदणी मठात परत करणार असल्याची घोषणा वनताराचे सीईओ विहान करानी यांनी पत्रकार परिषदेत केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनताराच्या पथकाने नांदणी मठातील हत्ती गेल्या आठवड्यात घेऊन गेले होते. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती.
या विरोधात आंदोलन छेडण्यात आले होते. तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक विचार करून हत्ती परत आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर वनताराचे विहान करानी तातडीने बुधवारी कोल्हापुरात येऊन मठाधिपतींशी चर्चा केली. सुमारे दोन तास विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर नांदणी मठ, वनतारा, राज्य सरकार सर्वजण मिळून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा महादेवी हत्ती नांदणी मठात आणला जाणार आहे.
याचिकेमध्ये वनतारामध्ये हत्तीसाठी जी व्यवस्था करण्यात आली आहे, तशाच पद्धतीची व्यवस्था या मठामध्ये करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘आम्ही ही याचिका पेटा आणि एचपीसी यांच्या पाठिंब्याने दाखल करणार आहे’. तसेच कोल्हापूरवासियांना दुखावण्याचा आमचा प्रयत्न नाही. सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे, त्यावर आम्ही काम करत होतो. सगळ्यांनी समजून घेतल्याबद्दल सर्वांचे आभार ही त्यांनी यावेळी मानले.
मालकी हक्क नांदणी मठाकडे राहणार
हत्ती परत आणल्यानंतर याचा मालकी हक्क नांदणी मठाकडे राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. हत्तीची देखभाल, वैद्यकीय व्यवस्था मात्र वनतारा पुरवणार आहे. ती परत येईपर्यंत वनताराने आम्हाला तसेच अनंत अंबानींनी सुद्धा सहकार्य करावे. आमचा त्यांना आशीर्वाद असेल, असे महास्वामिनींनी सांगितले.
कोल्हापुरात मोठा पोलिस बंदोबस्त
वनताराचे सीईओ हे बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कोल्हापुरात आले. यावेळी त्यांनी मठाधिपतींची भेट घेतली, यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूक लोकांशीच त्यांनी यावेळी चर्चा केली आणि आपली भूमिका जाहीर केली.
राज्यभरात उमटले याचे पडसाद
माधुरी हत्तीणीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता कोल्हापूरबरोबरच राज्यभरात याचे पडसाद उमटले. कोल्हापूर जिल्ह्यात शांततयरित्या आंदोलन झाले तर आक्रमक नागरिकांनी जिओ बॉयकट केले. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी देखील घेतली. महादेवीला परत आणण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या लढ्यात वनतारा सहभागी असेल असे सांगितले होते.