
Vidyashakti Education Society Financial Scam Hingoli News
Hingoli News : हिंगोली : सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मराठी शाळा (Marathi Schools)असताना कागदोपत्री इंग्रजी माध्यमाची शाळा दाखवून सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिले आहेत. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर विधानसभेतही हा मुद्दा गाजला. (Hingoli News)
आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी हा प्रश्न उपस्थित करत शाळेतील अनियमिततेची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री सावे यांनी प्राथमिक तपासात कागदपत्रांमध्ये खाडाखोड झाल्याचे दिसून येत असल्याचे स्पष्ट केले. माहितीनुसार, प्रत्यक्षात मराठी शाळा सुरू असताना कागदोपत्री इंग्रजी माध्यमाची शाळा दाखवून इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या राजे यशवंतराव होळकर नामांकित शाळा योजनेचा लाभ घेण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे दाखवून मोठ्या प्रमाणात निधी उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शाळेची मान्यता एका ठिकाणी असताना प्रत्यक्षात दुसऱ्याच ठिकाणी शाळा सुरू असल्याची बाबही समोर आली आहे. या प्रकरणात केवळ संस्थाच नव्हे तर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची तपासली जाणार आहे.
हे देखील वाचा : वाहतूक नियमभंग विरोधात पोलिसांची धडक कारवाई; २७५ प्रकरणात ३ लाख ९ हजारांचा दंड
चौकशीचे आदेश; विधानसभेत मुद्दा
मंत्री सावे यांनी या प्रकरणाची आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून शासनाच्या योजनांचा गैरवापर करून निधी उचलण्याचे प्रकार
थांबवण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे. चौकशी अहवालानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून आता चौकशी अहवालानंतर नेमकी कोणावर कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : नांदेडच्या महापालिकेच्या सभेत टीपू सुलतान पुतळ्यावरुन वाद; काँग्रेस, वंचित व भाजप- सेनेचे नगरसेवक आमने सामने
गैरव्यवहाराचे प्रमुख मुद्दे
मराठी शाळा असताना इंग्रजी शाळा दाखवल्याचा आरोप, कागदपत्रांमध्ये खाडाखोड, विद्यार्थ्यांची संख्या संशयास्पद, सुमारे ५ कोटी निधीचा वापर प्रश्नचिन्हाखाली, आयएएस अधिकाऱ्यांकडून चौकशी, दोषींवर फौजदारी कारवाईची शक्यता नामदार अतुल सावे यांची विधानसभेत घोषणा.