नांदेडच्या महापालिकेच्या सभेत टीपू सुलतान पुतळ्यावरून वाद निर्माण झाला (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेची पहिली सभा काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी केलेल्या ‘गोंधळयुक्त बोलंदाजी’ मुळे गाजली टिपू सुलतान यांचा पुतळा शहरात उभारण्याची मागणी केल्यामुळे सभागृहात भाजप शिवसेना युती व काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आमने सामने आले होते, शेवटी सर्व ठराव पास करण्यात आल्याचे सांगत महापौर कविता मुळे यांनी सभा संपल्याची घोषणा केली. राष्ट्रगीताला सुरूवात झाली, त्यामुळे सगळे नगरसेवक जागेवर उभे राहिले. (Nanded News)
मनपाच्या पहिल्याच सभेत ‘गोंधळात गोंधळ’ चा बहुपात्री प्रयोग पहावयास मिळाला. याच सभेत स्थायी समितीच्या १६, महिला व बालकल्याण समितीच्या ११ सदस्यांची तसेच ८ स्वीकृत सदस्यांच्या नावाची घोषणा महापौरांनी केली. महापौर कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली सभेस सुरूवात झाली. यावेळी उपमहापौर दिपकसिंह रावत, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, नगरसचिव तथा उपायुक्त स. अजितपालसिंघ संधू आदींची प्रमुख उपस्थिती होती. सभेत प्रामुख्याने स्व. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा असा ठराव ठेवण्यात आला होता. स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती च्या सदस्यांची निवड तसेच स्वीकृत सदस्यांची निवड करणे आदी विषयही विषय पत्रिकेवर ठेवण्यात आले होते.
हे देखील वाचा : वाहतूक नियमभंग विरोधात पोलिसांची धडक कारवाई; २७५ प्रकरणात ३ लाख ९ हजारांचा दंड
पंतप्रधान वाजपेयी यांचा पुतळा उभारणार
स्थायी समिती सदस्यांच्या तसेच महिला बालकल्याण समिती सदस्यांच्या नावाची घोषणा प्रथम महापौरांनी केली. त्यानंतर स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्याचा ठराव माजी सभापती किशोर स्वामी यांनी मांडला. त्यास शांभवी साले, साहेबराव गायकवाड यांनी अनुमोदन दिले. शांभवी साले यांच्या प्रभावी वक्तृत्वाने सभागृहाचे लक्ष देधून घेतले. पुतळ्याचा विषय सुरू असतानाच काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल गफ्फार यांनी माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांचा तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली. त्यांचा विषय संपतो न संपतो तोच वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक प्रशांत इंगोले यांनी टिपू सुलतान यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली, या मागणीस सत्ताधारी भाजप शिवसेना युतीच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शविला विषय पत्रिका सोडून वादग्रस्त विषय मांडू नका, असे महापौर, उपमहापौरांनी इंगोले यांना बजावले, तरी देखील महापौरांच्या आसनासमोर जावून काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी आपली मागणी लावून धरली, त्यामुळे भाजप, सेनेचे सदस्यही आसन सोडून समोर आले. सभागृहात गौधळाचे वातावरण निर्माण झाले. महापौर कविता मुळे, उपमहापौर दिपकसिंह रावत यांनी विषय पत्रिका सोडून बोलू नका, आसनावर जावून बसा असे फर्मान सोडले, तरीही नगरसेवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यामुळे गोंधळातच सर्व विषय पास असा नारा महापौरांनी दिला. व राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला.
हे देखील वाचा : DCM एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा चर्चेत; PM मोदींसोबत दीड तास चर्चा






