नांदेडमधील बेशिस्त वाहतूक चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांनी अवैध प्रवासी वाहतूक, परवाना किंवा परमिटशिवाय धावणारी वाहने, भरधाव वेगाने वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, फटाका बुलेट तसेच रस्त्यावर लावण्यात आलेले अनधिकृत फळगाडे व हातगाड्यांवर धडक कारवाई केली. (Crime News) या मोहिमेत एकूण २७५ प्रकरणे नोंदवून ३ लाख ९ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना किंवा परमिट चालणारी वाहने तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांना दिले. (Nanded News)
त्या अनुषंगाने १४ मार्च २०२६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेच्या पथकाने रेल्वे स्टेशन रोड, महावीर चौक, कलामंदिर, वर्कशॉप परिसर, राज कॉर्नर आणि छत्रपती चौक येथे विशेष तपासणी मोहीम राबवली. या वेळी वाहनांची कागदपत्रे तपासण्यात आली.
हे देखील वाचा : उन्हाळ्यात प्राण्यांची पाण्यासाठी वणवण! सौर उर्जेवर आधारित कृत्रिम जलस्त्रोत, टँकरचा केला जाणार उपयोग
ऑटो रिक्षा चालकांना गणवेश सक्तीच्या सूचना
तसेच ऑटो रिक्षा चालकांना गणवेश परिधान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कारवाईदरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने, ट्रिपल सीट दुचाकी, परवाना नसलेले चालक, अनधिकृत फळगाडे व हातगाडे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. दरम्यान, वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपली चारचाकी व दुचाकी वाहने रस्त्यावर कुठेही उभी न करता निश्चित पार्किंग ठिकाणीच पार्क करावीत, रस्त्यावर अतिक्रमण करू नये, वाहतूक सिग्नलचे पालन करावे तसेच वाहतुकीस अडथळा होईल अशी कोणतीही कृती करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा वजिराबाद येथील अधिकारी व अंमलदारांनी केली.
हे देखील वाचा : रस्त्यावर होळी तर नमाज पठन का नाही? ईदपूर्वी सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने थेट दिले CM योगींना आव्हान
लॉटरी जुगार प्रकरणी तिघांवर गुन्हा
नांदेड शहरातील श्रीनगर परिसरातील यादव कॉम्पलेक्स येथे बेकायदेशीररित्या ऑनलाईन लॉटरी जुगार चालविणाऱ्या तिघांवर भाग्यनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत नगदी रक्कम, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ६२ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १४ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास श्रीनगर येथील यादव कॉम्पलेक्समध्ये आरोपी रामदास पुरभाजी शिंदे (वय ३६, रा. प्रभात नगर), प्रदीप गणेशसिंह गहलोत (वय ३०, रा. गाडीपूरा) आणि माधव निवृत्ती सावंत (वय ४३, रा. तरोडा, नांदेड) हे विनापरवाना बेकायदेशीररित्या दस का दम नावाचा ऑनलाईन लॉटरी जुगार चालवत असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी छापा टाकून आरोपींकडून रोख रक्कम, तीन मोबाईल फोन व ऑनलाईन लॉटरी जुगाराचे साहित्य असा एकूण ६२ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मनोज राठोड यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.






