
विजय शिवतारे यांना कन्या ममता शिवतारे यांच्याकडून किडनी दान
सासवड / संभाजी महामुनी : मुलीच्या जन्मानंतर तिचे स्वागत झाले, तिला लहानाची मोठी करताना ज्ञान, विज्ञान आणि चांगले संस्कारही दिले. मोठी झाल्यावर सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून स्वतःच्या अनेक गोरगरिबांची लग्न लावून दिले. लग्नात कन्यादान केले. पुढे भविष्यात ज्यावेळी वडिलांना किडनीची गरज पडली, तेव्हा पतीसह कुटुंबियांना विचारात घेतले अन, माझा बाप जगला पाहिजे म्हणून स्वतःची किडनी दान केली. बापाने लग्नात केलेल्या कन्यादानाच्या बदल्यात लेकीने किडनी दान करून त्या बापाला खऱ्या अर्थाने जीवनदान दिले. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात याचीच चर्चा सुरु आहे.
शिवसेनेचे पुरंदरचे आमदार आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात सोमवारी ३० मार्च रोजी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. गेल्या अनेक वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या शिवतारे यांना त्यांच्या कन्या डॉ. ममता शिवतारे-लांडे यांनी स्वतःची किडनी दान करून वडिलांना नवजीवनच दिले आहे. सध्या पिता-कन्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
वडिलांसाठी लेकीचे ‘महादान’
विजय शिवतारे यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने त्यांना नियमित डायलिसिसवर राहावे लागत होते. प्रकृती खालावत चालल्याने किडनी प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय उरला होता. अशा कठीण प्रसंगी डॉ. ममता शिवतारे स्वतःहून पुढे आल्या. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या ममता यांनी एक कर्तव्यदक्ष मुलगी म्हणून समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे. ममता शिवतारे या प्रसिद्ध आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत.
विजय शिवतारे यांचा राजकीय प्रवास
विजय शिवतारे हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत असून, २००९ आणि २०१४ मध्ये त्यांनी सलग विजय मिळवला होता. राज्य मंत्रिमंडळात जलसंपदा राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. २०१९ च्या पराभवानंतर २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला. सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत कार्यरत आहेत.
सलग 13 दिवस उपोषण अन् किडनी निकामी…
विजय शिवतारे २००९ मध्ये प्रथमच शिवसेनेच्या तिकिटावर पुरंदरमधून निवडून आले. त्यावेळी कॉंग्रेससह राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवत अक्षरशः रान उठवले होते. पुरंदरला विकासकामे झाली नसल्याने विरोधी पक्षाच्या विरोधात वेगवेगळी आंदोलने केली होती. त्याच दरम्यान गुंजवणी धरणाचे हक्काचे पाणी पुरंदरला मिळावे, यासाठी सासवडच्या पालखी तळावर सलग १३ दिवस अन्नपाण्याशिवाय आमरण उपोषण केले होते. त्याच उपोषणाचा त्यांना मोठा फटका बसला. अन त्यांची किडनी निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हापासून त्यांना किडनीचा त्रास जाणवत होता.
हेदेखील वाचा : पुरंदर, बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नीरा–कऱ्हा नदीजोड प्रकल्पाला अर्थसंकल्पात मंजुरी