
रुग्ण बेडवर अन् डॉक्टर सुट्टीवर; मांडवगण फराटा आरोग्य केंद्रातील संतापजनक प्रकार
शिरुर/योगेश मारणे : शिरूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मांडवगण फराटा या मोठ्या बाजारपेठेतील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी (ता. 24) वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी दुपारपर्यंत अनुपस्थित असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. उपचारासाठी आलेल्या नागरिकांना “डॉक्टर सुट्टीवर आहेत, तपासणी उद्या होईल” असे सांगण्यात आले, परिणामी अनेकांना खासगी दवाखान्यांचा आश्रय घ्यावा लागला.
दवाखान्याच्या आवारात सर्वत्र घाण
गुरुवारी (ता. 24) सकाळी उपचारासाठी आलेल्या रुग्णांना तपासण्यासाठी आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपस्थित नव्हते. तसेच दवाखान्याच्या आवारात सर्वत्र घाण पसरली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या केबिनपुढे चिखल, माती व दुर्गंधीचा साठा झाला होता. शासकीय आरोग्य केंद्रातील हा प्रकार ऐन भाऊबीजेच्या दिवशी घडल्याने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली आहे.
बेफिकिरीवर तात्काळ कारवाई व्हावी
आरोग्य केंद्रात एक परिचारिका महिला वगळता कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हते. त्याच परिचारिका महिलेने रुग्ण नोंदणीपासून उपचारापर्यंतची धावपळ एकटीनेच सांभाळली. या काळात दैनंदिन तपासणी, आपत्कालीन सेवा व लसीकरणासारखी महत्त्वाची कामे पूर्णपणे ठप्प झाली होती.
दरम्यान ग्रामस्थ निलेश कोंडे यांनी सांगितले, “सकाळी खोकल्याचे औषध घेण्यासाठी आलो होतो. पण डॉक्टर नाहीत, उद्या या असे सांगण्यात आले. डॉक्टर नसल्यामुळे अनेकांना खाजगी दवाखान्यांचा रस्ता धरावा लागला. अशा बेफिकिरीवर तात्काळ कारवाई व्हावी.” अशी मागणी त्यांनी केली आहे.
डॉ.राजेश कट्टीमणी यांच्याकडे लेखी तक्रार
तसेच येथील अनेक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी काही कर्मचारी आरोग्य केंद्राच्या आतमध्येच दुचाकी पार्क करतात. त्यामुळे चिखल व माती पसरून अस्वच्छता वाढली आहे. “ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अशा प्रकारे वाहन पार्किंग करणे योग्य आहे का?” असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. या निष्काळजीपणा विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष संपत फराटे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक नरेंद्र माने आणि स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश कट्टीमणी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू
तक्रारीनंतर दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक दिवेकर आरोग्य केंद्रात दाखल झाले आणि तपासणीला सुरुवात झाली. दुपारी एक वाजेच्या सुमारास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हंकारे यांच्या आदेशानुसार केंद्राची साफसफाई करण्यात आली. मात्र,यावेळी ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, “डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या घटनेची चौकशी करून संबंधितांवर निलंबनासह कठोर कारवाई झाली नाही, तर आंदोलन करण्यात येईल.”