Villagers oppose meeting to build Purandar airport
सासवड : पुरंदर विमानतळ हे सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण अशा सात गावांमध्ये शासनाने विमानतळ प्रकल्प करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र यासाठी गावकऱ्यांचा सुरुवातीपासून विरोध आहे. पुरंदर विमानतळाची घोषणा झाल्यानंतर त्यादृष्टीने कामांचा सपाटा लावला आहे. नागरिकांचे मतपरिवर्तन करणे तसेच शासनाची भूमिका मांडणे आणि स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रत्येक गावात बैठकांचा धडाका सूर करण्यात आला आहे. स्थानिकांनी मात्र प्रशासनाच्या या प्रयत्नांकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे.
पुरंदर विमानतळ तयार करण्यासाठी ग्रामस्थांच्या अनेक प्रश्न आणि अडचणी आहेत. यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी त्यास तीव्र विरोध केला असून शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना कोणत्याही चर्चेविना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. मागील पंधरवड्यात शासनाने विमानतळ प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सातही गावांचा ड्रोन सव्हें करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आता पुन्हा नव्याने जमिनीवरील सर्व्हे करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे एकीकडे पाऊल टाकत असतानाच दुसरीकडे शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चर्चेचे दरवाजे उघडे करण्यात आले आहेत. त्यासाठी गावोगावी बैठकांचा धडाका लावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे, भोर विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, भूमी अभिलेख अधीक्षक स्मिता गौड तसेच यांच्यासह नायब तहसीलदार, विविध विभागांचे अधिकारी पोलीस फौजफाटा घेवून प्रत्येक गावात आढावा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील आठवड्यापूर्वी सुरुवातीला एखतपूर – मुंजवडी गावात बैठक घेतली. त्यास नागरिकांनी उपस्थिती दाखवीत जमीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर सासवड येथे तीन दिवसांचे उपोषण केले होते. अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेतले. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी चर्चाही केली मात्र त्यामधून कोणतेच सामाधान झाले नाही त्यामुळे विरोधाची भूमिका कायम ठेवण्यात आली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दरम्यान वनपुरी येथे आयोजित केलेल्या बैठकीत अपवाद वगळता नागरिकांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच शनिवारी १२ रोजी खानवडी आणि कुंभारवळण येथे बैठक आयोजित केली मात्र गावातील तिकडे फिरकले नसल्याने अधिकाऱ्यांना पुन्हा रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. दरम्यान १४ एप्रिल रोजी सकाळी वनपुरी, उदाचीवाडी त्यानंतर पारगाव येथे बैठक आयोजित केल्याचे पत्र प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी संबंधित गावच्या ग्रामसेवकांना दिले आहे. मात्र ग्रामस्थांनी कोणीही बैठकीस हजर राहणार नाही असे शासनाला कळविले असून गावोगावी ग्रामसभा घेवून विमानतळास विरोध असल्याचे ठराव करून अधिकाऱ्यांना देण्यात येत आहेत. त्यामुळे आता शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.