
पिंपरी : रिक्षाचालक म्हणून आपल्या करिअरची सुरूवात करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दुसरीकडे सोशल मीडियात रिक्षाचालक मुख्यमंत्री म्हणून शिंदेंच्या नावाचा मजकूर आणि त्यांच्या चेहऱ्याशी साम्य असलेला २५ वर्षांपूर्वीचा जुना फोटो रिक्षासह झळकला. त्याची जोरदार चर्चा होत आहे.
दरम्यान, हा फोटो पाहून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही या फोटोबद्दल उत्सुकता होती. यामुळे हा फोटो खरंच मुख्यमंत्री शिंदेंचा की पिंपरीतील महाराष्ट्र रिक्षा पंचायत या रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांचा हे जाणून घेण्यासाठी त्यांनी थेट कांबळे यांना फोन करून माहिती घेतली आहे. यावेळी खुद्द कांबळेंनी या फोटोबद्दल सविस्तर माहिती पवारांना दिली.
पवार यांनी कांबळे यांना आज फोन करून चौकशी केली. ते म्हणाले, “बाबा, ‘तो’ फोटो तुझा का?, अशी विचारणा त्यांनी कांबळे यांना केली. यावर कांबळे यांनी त्यांच्या सुरूवातीच्या काळात रिक्षाचालक म्हणून केलेल्या कामाची माहिती दिली आणि १९९७ साली श्रावण महिन्यात रिक्षा स्टॅंडवर रिक्षाची पूजा केल्यानंतर काढलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगितले.
तेव्हा अजित पवार हसत म्हणाले की, शिंदेंचा फोटो असल्याचे सांगितले जात आहे. हा फोटो भुजबळ साहेबांनीही देखील मला पाठवला. यामुळे नक्की काय समजत नव्हते. मात्र, नंतर कळालं की हा फोटो आपला आहे. यामुळे फोन केला, असे ते म्हणत त्यांनी कांबळे यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील एमएच-०३ ऐवजी पिंपरीतील एमएच-१४ असा त्या रिक्षाचा नंबर असल्याने संशय बळावला. यामुळे याबाबत काल कांबळे यांच्याकडे चौकशी केल्यावर हा फोटो शिंदेंचा नसल्याची माहिती मिळाली होती.
दरम्यान, या फोटोवर कमेंटचा पाऊस पडला. हा फोटो कांबळेचा आहे, हे माहिती असणाऱ्या पिंपरी-चिंचवड, पुण्यातील रिक्षाचालकांनी आता आमचा बाबा (कांबळे) हा आमदार व किमान नगरसेवक, तरी होणार अशा प्रतिक्रिया दिल्या. तर, हा फोटो शिंदेंचा आहे, हे समजलेल्यांनी रिक्षाचालकच मुख्यमंत्री झाले आहेत, यात काही शंका नाही अशा पोस्टही टाकल्या होत्या.
याबाबत बाबा कांबळे म्हणाले, या पोस्टनंतर असंख्य फोन आल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या व शिंदेंच्या जुन्या फोटोत साम्य असल्याने नेटकऱ्यांचा गैरसमज झाला असावा, असा उलग़डा त्यांनी केला. एका बातमीसाठी मराठी दैनिकाला माझ्या कार्यालयातून हा फोटो देण्यात आला होता. नंतर तो सोशल मीडियात कसा गेला व फिरला हे, मात्र कळले नाही. पण रिक्षाचालकांत त्याची मोठी चर्चा झाली, असे कांबळे यांनी सांगितले.
शिंदे हे राजकारणात येण्यापूर्वी ठाण्यात रिक्षाचालक होते. म्हणून एक रिक्षाचालक आज मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाला असल्याचे सांगणारी रिक्षासह तिच्या चालकाचा (शिंदेचा) फोटो असलेली ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली. नेहमीप्रमाणे व्हाटसअप विद्यापीठात त्याची खात्री न करता भरभरून कमेंट आल्या. मुंबई, ठाण्यातील ग्रुपवरही ती गेली. फेसबुकवरही पसरली होती.