
Panvel Municipal Corporation: राष्ट्रवादीचा गड कोसळला; पनवेल महापालिकेत फुलले कमळ आणि धनुष्यबाण
कळंबोलीतील एकूण १६ पैकी तब्बल १६ जागांवर महायुतीने विजय मिळवला. भाजपचे १२ नगरसेवक निवडून आले, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे प्रत्येकी दोन नगरसेवक विजयी झाले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. ‘तुतारी’ चिन्हावरील उमेदवारांना तर भोपळाही फोडता आला नाही.
हेही वाचा: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इंदापूर प्रशासन सज्ज; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
या निकालातून केवळ महाविकास आघाडीच नव्हे, तर गुलाबराव जगताप आणि शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वालाही कळंबोलीकरांनी स्पष्ट नकार दिल्याचे बोलले जात आहे. प्रचारादरम्यान जगताप हे प्रत्यक्ष मैदानात उतरलेले दिसले नाहीत. महाविकास आघाडीने त्यांच्या बॅनर आणि फोटो लावले, मात्र ते प्रचार सभांसाठी आले नाहीत. फक्त शशिकांत शिंदे यांची एक सभा कळंबोलीत झाली. त्यामुळे जगताप हे तटस्थ राहिले का, की त्यांनी जाणीवपूर्वक अंतर ठेवले, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
कळंबोली आणि नवीन पनवेल हे पनवेल तालुक्यात सर्वात आधी विकसित झालेले भाग आहेत. येथे लोह-पोलाद मार्केट उभे राहिल्याने मोठ्या प्रमाणात माथाडी कामगारांची वस्ती निर्माण झाली. शरद पवार मुख्यमंत्री असताना माथाडी कामगारांना घरे देणे, माथाडी कामगार कायदा अस्तित्वात आणणे यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांतून आलेल्या माथाडी कामगारांची शरद पवार यांच्याशी दीर्घकाळ निष्ठा राहिली आणि कळंबोलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले.
या पार्श्वभूमीवर गुलाबराव जगताप यांनी अनेक वर्षे कळंबोलीतील माथाडी कामगारांचे नेतृत्व केले. हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँक, स्टील मार्केट कमिटीचे अध्यक्षपद आणि लोह-पोलाद मार्केटवरील त्यांचे वर्चस्व यामुळे कळंबोलीत’ जगताप म्हणजे राष्ट्रवादी’ असे समीकरण तयार झाले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनाही कळंबोलीत मानणारा मोठा वर्ग होता. २०१७ च्या निवडणुकीतही माथाडी कामगारांनी महाविकास आघाडीला स्पष्ट कौल दिला होता.
हेही वाचा: Dharashiv PWD Corruption: धाराशिवमध्ये भ्रष्टाचाराचा कळस; लाखोंचे रस्ते काही दिवसांतच उखडले
याशिवाय शशिकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकेचे प्रभारी पद स्वतः कडेच ठेवले होते. तरीही कळंबोलीसह संपूर्ण पनवेल परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अपयश पत्करावे लागले.
त्यामुळे संघटनात्मक अपयश, स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव कमी होणे आणि बदलत्या मतदार मानसिकतेचा फटका पक्षाला बसल्याचे मानले जात आहे. एकूणच कळंबोलीतील हा निकाल म्हणजे केवळ सत्तांतर नाही, तर माथाडी कामगारांच्या राजकारणात झालेला मूलभूत बदल आहे. भाजपने पारंपरिक प्रभाव, करिष्मा आणि जुनी निष्ठा यांची गणिते मोडून काढत विकास, स्थैर्य आणि सत्तेच्या ताकदीचा नवा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आगामी काळात कळंबोलीचे राजकारण कोणत्या दिशेने जाईल आणि माथाडी नेतृत्व पुन्हा उभारी घेऊ शकते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.