VP Elections 2025:
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना एनडीएच्या एकूण संख्येपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. यामध्ये अनेक विरोधी खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले असून, १५ मते अवैध ठरवण्यात आली आहेत. याबाबत वृत्तसंस्था एएनआयने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांना विचारले असता, त्यांनी राधाकृष्णन यांच्यावर गंभीर आरोप केला. अरविंद सावंत म्हणाले, ” राधाकृष्णन यांनी मते विकत घेतली असतील, पैसे दिले असावेत, म्हणूनच त्यांना एवढ्या प्रमाणात मते मिळाली असावीत. त्यामुळेच ते विरोधी पक्षातील खासदारांचेही आभार मानत आहेत. खासदारांनी त्यांच्या विवेकबुद्धीने मतदान करावे,असं ते सांगत होते. मग त्यांनी विवेक वापरून मतदान केले की मते विकून मतदान केले, असा सवालही अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.
सावंत म्हणाले, “१५ मते अवैध ठरवली गेली आहेत. हे १५ खासदार अशिक्षित आहेत का? ते खासदार आहेत, त्यांनी मुद्दामच तशी मते टाकली असावीत. ही बाब अत्यंत गंभीर आहे.” सावंत यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. “जे बीज पेरले गेले आहे, ते भाजपने पेरले आहे. सरकारे पाडणे, खासदार व आमदारांची खरेदी करणे, हा त्यांचा प्रकार आहे. त्यांच्या गुलाम ईडी-सीबीआय सारख्या यंत्रणा विरोधकांना त्रास देण्यासाठी वापरल्या जातात. ही यंत्रणा आता त्यांच्या हुकमावर चालते. कुणाच्या घरी जावे हे भाजप सांगतो आणि त्या यंत्रणा तिथे पोहोचतात,” असा आरोपही त्यांनी केला.
पुढे बोलताना सावंत म्हणाले, “जे बीज पेरले गेले आहे, ते भाजपने पेरले आहे – सरकारे तोडणे, सत्ता उलथवणे, खासदार आणि आमदारांची खरेदी करणे हे त्यांच्या कार्यपद्धतीचा भाग बनला आहे. त्यांच्या इशाऱ्यावर ईडी आणि सीबीआयसारख्या तपास यंत्रणा काम करत आहेत. हा त्यांचा व्यवसायच झाला आहे. कोणाच्या घरी तपास घालायचा, हे भाजप सांगतो आणि त्या यंत्रणा तिथेच पोहोचतात.”
अरविंद सावंत म्हणाले की, तुम्ही हा प्रश्न का विचारत नाही की जगदीप धनखड साहेबांना ५२८ मते मिळाली तर यावेळी भाजपच्या उमेदवाराला ४५२ मते मिळाली, मग मते का कमी झाली? तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की गेल्या वेळी विरोधकांना २६ टक्के मते मिळाली तर यावेळी ४० टक्के मते मिळाली, प्रथम तुम्ही पाहता की त्यांची मते कमी होत आहेत, आमची वाढत आहेत.
एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना ४५२ पहिल्या पसंतीची मते मिळाली आणि विरोधी उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. या निवडणुकीत, इलेक्टोरल कॉलेजच्या एकूण ७८१ सदस्यांपैकी ७६७ (एक पोस्टल बॅलेट) सदस्यांनी मतदान केले, ज्यामध्ये १५ मते अवैध घोषित करण्यात आली. मंगळवारी सकाळी १० वाजता मतदान सुरू झाले आणि सायंकाळी ५ वाजता संपले.