
आमदार महेंद्र थोरवे यांचा संशय; सर्व शंकांच्या चौकशीची मागणी (Photo Credit- X)
पत्रकार परिषदेत बोलताना महेंद्र थोरवे म्हणाले की, “मंगेश काळोखे यांची हत्या करण्याची सुपारी ही १ कोटी रुपयांची होती. यातील २० लाख रुपये हे केवळ ‘टोकन’ म्हणून देण्यात आले होते. मुख्य आरोपी रवी देवकर याची आर्थिक परिस्थिती पाहता, तो स्वतः २० लाख रुपये देऊ शकत नाही. मग एवढी मोठी रक्कम आली कुठून? यावरूनच भरत भगत आणि सुधाकर घारे यांची नावे समोर येत आहेत. भरत भगत याच्या अटकेपूर्वी त्याचे आणि आरोपींचे १२ वेळा कॉल झाले होते, मात्र सुधाकर घारे अद्याप मोकाट आहेत.”
थोरवे यांनी या प्रकरणात थेट सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला. “न्यायालयाने सुधाकर घारे यांना अटक करून त्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तरीही पोलीस त्यांना अटक करत नाहीत. उलट घारे उजळ माथ्याने निवडणुकीचा प्रचार करत आहेत. त्यांना गृहखात्याच्या माध्यमातून सुनील तटकरे यांचे पाठबळ मिळत आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तपासातील अनेक त्रुटींकडे लक्ष वेधताना थोरवे यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. २३ डिसेंबर रोजी कॉल होतात आणि त्यानंतर तीन दिवसांनी हत्या होते, हे पाहता हा एक नियोजित कट असल्याचे स्पष्ट होते. हत्येच्या वेळी सुधाकर घारे जाणीवपूर्वक गुजरात राज्यात गेले होते का? आपण या गुन्ह्यात नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी हा बनाव रचला होता का? काळोखे यांच्या घराशेजारी राहणारी दोन कुटुंबे हत्येच्या दिवसापासून गायब आहेत, त्यांचा शोध पोलिसांनी अद्याप का घेतला नाही?
खोपोलीतील काही पोलीस अधिकारी अत्यंत उद्धटपणे वागत असून आरोपींबाबत सहानुभूती दाखवत असल्याचा आरोप थोरवे यांनी केला. या प्रकरणातील पोलीस तपासात सुधारणा व्हावी, यासाठी वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
मंगेश काळोखे यांना न्याय मिळवून देण्यासाठी या गुन्ह्याच्या तपासात स्पेशल सरकारी वकील नेमावा आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी आग्रही मागणी आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे. या प्रकरणामुळे आता खोपोली आणि कर्जत परिसरात खळबळ माजली असून, पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.