
wardha
गाडेगाव, (वा.). समुद्रपूर तालुक्यातील भोसा (गौळ), उमरा, मार्डा व परिसरात झालेल्या मुसळधार पावसानंतर नदीला आलेल्या पुरामुळे शेकडो एकरांवरील खरीप पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. भोसा (उमरा) शिवारातील नदीवरील बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात काडी-कचरा, झाडांच्या फांद्या आणि गाळ अडकल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे ठप्प होतो. परिणामी नदीचे पाणी थेट शेतांमध्ये शिरून सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि ज्वारीसह विविध खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले.
३० व ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर भोसा (गौळ), उमरा, मार्डा परिसरातील अनेक शेतांमध्ये पाणी साचून राहिले, अनेक दिवस पाणी न ओसरल्याने उभी पिके कुजून गेली असून शेतकऱ्यांचे संपूर्ण खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले आहे. बियाणे, उघड खते आणि औषधांवर झालेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे, ३० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या भोसा (गौळ) बंधाऱ्याच्या नियोजनातील त्रुटी यंदाच्या पावसात पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात नदीतील काडी कचरा व गाळ बंधाऱ्यात अडकल्याने पाण्याचा निचरा थांबतो आणि नदीचे पाणी मागे साचून थेट शेतांमध्ये घुसते. त्यामुळे दरवर्षी शेकडो एकर शेती जलमय होत असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे.
यापूर्वीही या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी विविध माध्यमातून आवाज उठविण्यात आला होता. बंधाऱ्यातील गेटची योग्य व्यवस्था करणे, नियमित गाळ व कचरा काढणे आणि पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी कायमस्वरूपी तांत्रिक उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी अनेक वर्षापासून करीत आहेत. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पुरामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने आता रब्बी पिकांवरच अवलंबून राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या आधारे नुकसानभरपाई जाहीर करावी, तसेच भोसा (गौळ) बंधाऱ्याची तातडीने तांत्रिक पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोक आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी वर्गाने दिला आहे.
पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीमुळे अनेक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाल्याने आता रब्बी पिकांवरच अवलंबून राहण्याची वेळ आल्याचे शेतकरी सांगत आहेत. भोसा (गौळ) येथील शेतकरी नीलेश गोस्वामी यांनी बंधाऱ्यालगतची त्यांची ३० एकर शेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचे सांगत उत्पादन खर्चाच्या आधारे तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
शेतकरी आणि ग्रामस्थांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करण्यासोबतच भोसा (गौळ) बंधाऱ्याची तांत्रिक पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.