
Weather Update : राज्यभरात पावसाचा मोठा खंड; पाणीटंचाईची निर्माण झाली धास्ती, प्रशासन सतर्क
पुणे : राज्यभरात पावसाने मोठा खंड दिल्याने संभाव्य पाणीटंचाईची धास्ती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी भूजल उपशावर निर्बंध घालण्याचे निर्देश शासनाने दिले असून, त्याची अंमलबजावणी पुणे जिल्ह्यातही होणार का, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, ऑक्टोबरपासून संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी तयार करून टंचाई कृती आराखडा निश्चित करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या 500 मीटर परिसरात पिण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी विहिर खोदण्यास परवानगी देऊ नये, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिले आहेत. सध्याच्या विहिरींमधून होणाऱ्या उपशामुळे पिण्याच्या पाण्याच्या स्रोतावर परिणाम होत असल्याचे आढळल्यास संबंधित विहिरीतील भूजल उपशावर ठरावीक कालावधीसाठी बंदी घालता येणार आहे.
सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून एक किलोमीटर अंतरातील विहिरींमधून भूजल उपशावरही तात्पुरती बंदी आणण्याची कार्यवाही जिल्हा प्राधिकरणाला करता येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पावसाची स्थिती, भूजलपातळी आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरील ताण यांचा आढावा घेऊन स्थानिक पातळीवर निर्णय होण्याची शक्यता आहे.
टंचाई जाहीर झाल्यास टँकर अखेरचा पर्याय
एखाद्या गावात पाणीटंचाई जाहीर झाल्यानंतर थेट टँकर सुरू करण्याऐवजी जलसंधारण, पाणी स्रोतांचे बळकटीकरण आणि इतर तातडीच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. अन्य उपाययोजना करूनही पाणी उपलब्ध करणे शक्य नसल्यासच टँकर किंवा बैलगाडीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
ऑक्टोबरमध्ये गावनिहाय आढावा
अपुरा पाऊस, भूजलपातळीतील घट आणि पाण्याच्या स्रोतांवरील वाढता ताण लक्षात घेऊन ऑक्टोबरपासून संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी तयार करण्यात येणार आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या संयुक्त अहवालासह ही यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे.
पुणे जिल्ह्यात कुठे परिणाम?
पुणे जिल्ह्यात पावसाची स्थिती, धरणसाठा, भूजलपातळी आणि गावनिहाय पिण्याच्या पाण्याची उपलब्धता यावर संभाव्य टंचाईचे स्वरूप अवलंबून राहणार आहे. त्यामुळे विहिरींच्या उपशावर निर्बंध घालण्याबाबतचा निर्णय सरसकट न घेता संबंधित पाणी स्रोतांची स्थिती आणि स्थानिक गरजांचा आढावा घेऊन होण्याची शक्यता आहे.
दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता
पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्टा वगळता पूर्व पट्ट्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पूर्वपट्टातील तालुक्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी होणार का याकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत.