मेढा : मेढा नगरपंचायतीच्या (Medha Nagar Panchayat) वतीने आकारण्यात आलेली चतुर्थ मिळकत कर आकारणी ही अन्यायकारक व अवाजवी असून, पुन्हा स्थलदर्शक पाहणी करून ही आकारणी करावी. अन्यायकारक कर आकारणी कमी न केल्यास नगरपंचायतीच्या समोर ठिय्या आंदोलन तसेच बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा मेढा शहर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, तसेच मिळकतधारक व मेढा ग्रामस्थ यांच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन जिल्हाधिकारी सातारा रूचेश जयवंशी, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, सहाय्यक संचालक नगररचना सातारा सतिश वाणी, जावलीचे तहसीलदार राजेंद्र पोळ, मुख्याधिकारी अमोल पवार यां सर्वांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले आहे. याप्रसंगी सुरेश पार्टे, शिवाजीराव देशमुख, प्रकाश कदम, अरुण जवळ, सचिन जवळ, प्रभाकर धनावडे, इम्रान आतार, संजय जुनघरे, संदीप पवार, योगेश कांबळे, अभिजीत शिंगटे, संतोष पवार, ऋषिकेश शेलार इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मिळकतधारक ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना दिलेल्या निवेदनाच्या माहितीवरून मेढा हे जावली तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे मेढा ग्रामपंचायतील नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला. मेढा नगरपंचायत ही महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या व सर्वात कमी उत्पन्न असणारी बाजारपेठ आहे. शहराची लोकसंख्या सरासरी पाच हजाराच्या आसपास आहे. चटई क्षेत्रही कमी आहे. तर मेढा लगतची गावे धरणग्रस्त असल्यामुळे लोकांचे स्थलांतर अन्यत्र झालेले आहे. त्यामुळे अल्प लोकसंख्या व अल्प उत्पादनाची साधने असल्यामुळे मेढा बाजारपेठेवर खुप मोठा आर्थिक परिणाम झाला आहे.