तुळशी नदी पात्रात पाच फणीच्या नागाची 'ती' केवळ अफवाच; शोध घेतल्यास आढळले पाणमांजर
सडोली खालसा / प्रकाश पाटील : नदीत पाच फणीचा नाग तरंगू लागला, अशी अफवा बघता बघता गावात पसरली…अख्ख गाव नदी काठावर जमलं…पण अभ्यासकाने निरीक्षण केल्यावर दुर्मिळ पाणमांजराचे दर्शन उपस्थितांना झाले. ही घटना आहे करवीर तालुक्यातील कांचनवाडी, चापोडी नदी बंधाऱ्याच्या ठिकाणची…मात्र याची चर्चा परिसरात चांगलीच रंगली.
करवीर तालुक्यातील तुळशी नदी वाहते आहे. या ठिकाणी येऊन एक नागरिक जात असताना त्याला नदीपात्रात पाण्याच्या पातळीपासून उंचीवर प्राणी दिसले. यावेळी त्यांनी हा पाच फणीचा नाग असावा असा त्याचा समज झाला ही बातमी त्यांनी गावात सांगितली. बघता बघता नागरिकांमध्ये पाच फनीचा नाग म्हणून सर्वत्र अफवा पसरली गेली. ही वावडी पसरताच कांचनवाडी, चाफोडी दरम्यान नदीवरील बंधाऱ्यावर नागरिकांनी गर्दी केली. दिसायला तांबूस रंगाचे दोन ते तीन फुट लांबीचे पाच सस्तन प्राणी आढळून आले. काही युवकांनी त्याचे चित्रीकरण केले. हे चित्रण प्राणी तज्ज्ञांना पाठवले त्यांच्या मते सदरचे हे पाचही प्राणी सस्तन वर्गातला असून, दुर्मिळ पाणमांजर असल्याचे सिद्ध झाले.
तुळशी नदीपात्रात आढळलेला प्राणी हा पाणमांजरच असून पुराच्या पाण्यातून तुळशी नदी पात्रात पहिल्यांदाच तरंगताना पाहायला मिळाला आहे. पाणमांजर हा समूहाने राहणारा प्राणी असून, शक्यतो मानवीवस्तीजवळ न आढळणारा हा प्राणी मानवा जवळपासच्या काही भागात आला तरी माणसांशी कमीतकमी संपर्क येण्याच्या दृष्टिकोनातून ते रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतात. परंतु, काही कारणास्तव त्यांना दिवसा बाहेर पडायचे झाले तरी त्यांची मादी प्रथम बाहेर पडून ती जागा सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासून घेते. मगच बाहेर पडते. पाण्यावर तरंगणारा पाण्यात गायब होणारे पाणमांजर हा पाचफणीचा नाग नसून ते पाणमांजरच होते. पण उपस्थितांची मात्र काही तास चांगलीच करमणूक झाली.
पाणमांजर पाण्यात पोहोण्याचा मनसोक्त आनंद लुटणारा हा प्राणी प्रामुख्याने कोकणातील नद्या आणि खाडी प्रदेशांमध्ये आढळतो. उदमांजर, उद, उदळ, घिर्या अशा विविध स्थानिक नावांनी ओळखला जातो. समूहाने राहात असलेली ही पाणमांजरे फार क्वचितच किनार्यावर आलेली पाहायला मिळतात. संशोधकांच्या मते, उदमांजर हे पाणथळ जागेचे प्रतिनिधित्व करतात. जगभरात पाणमांजराच्या १३ प्रजाती आहेत. या प्रजातींपैकी स्मुथ कोटेड ऑटर्स, एशियन स्मॉल क्ल्वॉड ऑटर्स आणि युरेशियन ऑटर्स या तीनच प्रजाती भारतात आढळतात.
मानवाच्या जीवितास नसतो कोणताही धोका
पावसाळ्यातील पुराच्या पाण्यात आलेले हे सस्तन पाणमांजरे हे मासे, खेकडी व पाण्यातील अन्य जीव खाऊन जगतात त्यांचा मानवास कोणताही धोका नसतो. खाडीपट्ट्यात कित्येक वेळा आढळून आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाचफणीचा नाग वगैरे काही नसून ती पानमांजरेच आहेत हे मात्र नक्की आहे.
– संजय दळवी , कांचनवाडी (रायगड वास्तव्य)
सस्तन प्राणी अभ्यासक