मंचर : आंबेगाव पंचायत समितीच्या मार्फत तालुक्यातील नागरिकांसाठी १६ टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शिवाय १५ विहिरी अधिग्रहित केल्या असल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यामध्ये सध्या बहुतेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये धामणी, मांदळेवाडी, पारगाव तर्फे खेड, कुरवंडी, वडगावपिर, कारेगाव, पहाडदरा, भावडी, गोहे बुद्रुक, जांभोरी, आसाणे, साकेरी, पिंपरी, लोणी, फलोदे, तळेघर, थुगांव या २९ हजार ६७ लोकसंख्या असलेल्या १२ ग्रामपंचायती व लगतच्या ८४ वाडयावस्त्यांसाठी १६ टॅंकरने पाणीपुरवठा चालू करण्यात आला आहे. यासाठी १ शासकीय व १५ खाजगी टॅंकर आहे.
टँकरसाठी ९ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव
त्याचप्रमाणे १५ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. दरम्यान पाण्याचे टॅंकर चालू करावे, यासाठी कुशिरे खुर्द व बुद्रुक, बोरघर, फुलवडे, तिरपाड, पेठ, उगलेवाडी, महाळुंगे पडवळची ठाकरवाडी, तांबडेमळा या ९ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मंजुरीसाठी आले आहेत. संबंधित प्रस्तावांना मंजुरी मिळताच त्या ठिकाणी पाण्याचे टॅंकर चालू करण्यात येणार आहेत.
तसेच ज्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यांनीही आपले प्रस्ताव पंचायत समिती आंबेगाव येथे लवकरात लवकर दयावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी केले आहे.