
उंब्रज/अनिल कदम : अवकाळी, महापूर किंवा दुष्काळ अशा निसर्गाच्या अवकृपेने बळीराजाला अस्मानी व सुलतानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून उपाययोजना होत नसल्याने शेतकरी अधोगतीला लागला आहे. मात्र, शहरी डामडौल आणि दिखाऊ श्रीमंती हेच सर्वस्व समजणाऱ्या मुलींचीही संख्या कमी नाही. परिणामी, शेतकरी नवरा त्यांना सुरक्षित वाटत नाही. यामुळे लगीनघाई सुरू पण शेतकरी नवरा नको ग बाई…. ! असा सूर आळवला जात असल्याने लग्न जुळविताना आई-वडिलांसह नातेवाईकांची कसरत होत आहे.
त्यामुळे विवाहयोग्य मुली जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी मुलाला कमी प्रतिष्ठेचे समजून शासकीय नोकरदाराला पसंती देत असून, शेतकरी मुलाला चक्क नकार देत असल्याचे दिसून येते आहे. बहुतांश मुलींकडून तर मुलाच्या घरी शेती पाहिजे, पण शेतकरी नवरा नको! अशी विचित्र अपेक्षा व्यक्त होतांना दिसून येत आहे.
कोरोनाच्या काळात शहरात गेलेले तरुण मुले गावी परत आले होते. त्यातील काही तरुण परतले तर काही तरुण गावी थांबले. काहींच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे बेरोजगारी वाढली असून, कित्येक तरुणांचे लग्न जोडणे अवघड झाले आहे. ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी, मजुरवर्ग आदी कुटुंबातील युवकांचे वय वाढत आहे.
मुलगा मुलगी पाहायला गेल्यावर मुलीच्या कुटुंबाकडून मुलाला नोकरी आहे का? असा प्रश्न असतोच! सरकारी नोकरीच्या मुलांची चलती असल्याने बाकीच्यांना लग्न जुळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अर्धवट शिक्षण घेऊन शेती व इतर उद्योग व्यवसाय करणाऱ्या तरुणांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. नात्यातील मुलींची शोधाशोध केली जात आहे. परंतु, नातेवाईक मुलगी देण्यास तयार नसल्याची बाब समोर आली आहे.
निसर्गाच्या अवकृपेने व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक पित्याला मुलगी चांगल्या घरी नांदावी, असे वाटते. ग्रामीण भागातील मुलींच्या पित्याची नजर शहरी भागातील मुलांकडे वळली आहे. श्रीमंत असो वा गरीब असो शेतकरी मुलाला मुलगी देण्यास पिता नकार देत आहे.
शेतकरी युवकांत नैराश्य
शिकलेल्या मुली लग्नासाठी नोकरी असणाऱ्या मुलांना प्राधान्य देत आहे. पण शिकून शेती व्यवसायात राहिलेल्या शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली देण्यास बहुतांश पालक पुढे येत नसल्याचे चित्र निर्माण होत आहे. शेतकरी मुलांना लग्नासाठी वर्षानुवर्षे मुली बघण्यात वेळ घालावा लागत आहे. ४० वर्षे उलटून गेली तरी काही तरुण लग्न जुळविण्यासाठी धडपडत आहे. लग्न ठरत नसल्याने या शेतकरी युवकांत नैराश्य, व्यसनाधीनता वाढत आहे.
मुला-मुलींच्या अपेक्षा वाढल्या
जोडीदाराविषयी आज मुला-मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सरकारी नोकरी, देखणेपण, मोठ्या शहरात घर, चारचाकी वाहन अशा अपेक्षा ठेवल्या जातात. नणंद, सासू-सासरे व कुटुंबातील इतर मंडळी नसली तर आणखीच बरे, अशी आशा ठेवून सोयरीकीचा प्रवास सुरु होतो. मुलगा-मुलगी नव्हे तर काही बाबतीत त्यांचे पालकही हाच विचार करताना दिसतात. अपेक्षांचा आलेख वाढतच जात असल्याने सोयरीकीलाही विलंब होत आहे.
समव्यवसायी जोडीदार शोधण्याकडे कल
समव्यवसायी जोडीदार शोधण्याकडे सर्वांचाच कल आहे. पती-पत्नी दोघेही कमावते असल्यास आर्थिक बाजू मजबूत राहते. एकाच व्यवसायातील असल्यामुळे दोघांमध्ये चांगला समन्वय राहतो. चांगल्या नोकरीचा मुलगा मिळाला नाही तर व्यावसायिक तरुणालाही वर म्हणून पसंती दिली जाते. या सर्व प्रयत्नात अपयश आल्यानंतर मध्यमवर्गीय कुटुंबाकडे पालकांची पावले वळतात.
वडिलधाऱ्यांचा शब्द अडगळीत
पूर्वी सोयरीक करताना मुला-मुलीचे मत किवा अपेक्षा विचारात घेतल्या जात नव्हत्या. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळीचा शब्द प्रमाण मानला जात होता. थेट नवरदेव-नवरी म्हणूनच मुलगा-मुलगी मंडपात दाखल होऊन शुभमंगल होत होते. आता प्रत्येक बाबतीत उपवर वधूंच्या अपेक्षा जाणून घेतल्या जातात. दोघांचीही शैक्षणिक पात्रता, कमाईचे माध्यम याविषयी विचार करूनच संबंध जुळविले जातात.
लिव्ह इन,प्रेमविवाह संस्कृती बोकाळली
उच्चभ्रू सोसायटीतील लिव्ह इन संस्कृती सध्या निमशहरी भागात बाळसे धरू लागली आहे तर प्रेमविवाह फॅशन म्हणून अंगिकारले जाऊ लागले आहे परंतु या दोन्हींचा परिणाम योग्य चाचपणी न करता जोडीदाराची निवड केली तर फसगत होण्याची भीती निर्माण झाली असून, यामुळे फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागल्याची उदाहरणे समोर आली आहेत. यामुळे पालकांनीच आपल्या मुलांना योग्य समुपदेशन करून खबरदारी घेण्याची वेळ आली आहे.