
फोटो सौजन्य - Social Media
गेल्या बारा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आत्मनिर्भरता, आर्थिक प्रगती आणि जागतिक स्तरावर मजबूत ओळख निर्माण करत विकासाच्या नव्या उंची गाठल्या आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मुंबईतील प्रभादेवी येथे रविंद्र नाट्यमंदिरात आयोजित “राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती” या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय कुटे, आमदार सुनील राणे आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “Make in India” आणि “Make for world” यांसारख्या उपक्रमांमुळे भारताने उत्पादन, उद्योग आणि आत्मनिर्भरतेच्या क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे. एकेकाळी मदतीची अपेक्षा असलेला देश म्हणून पाहिल्या जाणाऱ्या भारताने आज जागतिक पातळीवर प्रभावी राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आला. उज्ज्वला योजना, घराघरात शौचालय उभारणी आणि गरीब कल्याणाशी संबंधित उपक्रमांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल झाल्याचे त्यांनी सांगितले.
देशाच्या आर्थिक वाढीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, २०१३-१४ मध्ये भारताचा जीडीपी १०३ लाख कोटी रुपये होता, तो २०२५-२६ मध्ये ३५७ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्राचाही जीडीपी १३ लाख कोटींवरून ५४ लाख कोटींवर गेला असल्याचे त्यांनी नमूद केले. ही वाढ केवळ घोषणांमुळे नव्हे, तर दीर्घकालीन नियोजन, धोरणात्मक निर्णय आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या मते, भारताने या काळात आर्थिक, डिजिटल, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन अनुभवले आहे. महिलांचे सक्षमीकरण, युवकांना संधी आणि गरीबांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रभावी काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. “राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती” या विशेष संग्राह्य अंकामध्ये अखंड भारत, अंत्योदय, सुरक्षित भारत, युवा शक्ती, मातृप्रधान भारत, विज्ञान, उद्योग तसेच विकसित भारत २०४७ या विविध महत्त्वपूर्ण विषयांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. याशिवाय जागतिक स्तरावर भारताने निर्माण केलेला प्रभाव, सीमांवरील ठाम भूमिका आणि मानवतेच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्या भारताचे विविध पैलू या अंकात मांडण्यात आले आहेत.
मोदींनी स्वतःला राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले असून ते खऱ्या अर्थाने “राष्ट्र तपस्वी” असल्याचे गौरवोद्गार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी काढले. “राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती” हा अंक नव्या भारताच्या परिवर्तनाचा महत्त्वपूर्ण दस्तावेज ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.