वाई : कृष्णा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, या कामास आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी ठेकेदार व पालिका प्रशासनाकडून माहिती घेतली. पुलाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर कामात कोणताही हलगर्जीपणा करू नये, अशा सूचना संबंधितांना दिल्या.
येथील कृष्णा नदीवरील जुना ब्रिटीशकालीन धोकादायक पूल पाडून त्याठिकाणी नवीन पूल उभारण्याचे काम पालिकेने काही दिवसापूर्वी हाती घेतले. त्यासाठी शासनाने १५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. या पुलाचे काम पुण्यातील टी अँड टी इन्फ्रा या कंपनीमार्फत युध्दपातळीवर सुरू आहे. जुलै महिनाअखेर पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने आमदार पाटील यांनी या कामाची पाहणी मुख्याधिकारी व पालिका पदाधिकारी यांच्या समवेत केली.
ठेकेदारांकडून चालू कामाचा आढावा घेत समाधान व्यक्त केले. यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे कार्याध्यक्ष संजय लोळे, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, उद्योजक अरविंद काका कुदळे,माजी नगरसेवक चरण गायकवाड, भारत खामकर, राजेश गुरव, प्रदीप चोरगे, प्रदीप जायगुडे, प्रसाद मामा देशमुख, चंद्रशेखर ढवण यांची प्रमुख उपस्थिती होती.
नियोजित वेळेत म्हणजे सहा महिन्याच्या कालावधीत नवीन पूल उभा करण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला होता. त्याला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून वेळेतच काम पूर्ण करण्याच्या व कामाचा दर्जा योग्य ठेवण्याच्या सूचना यावेळी आमदार पाटील यांनी दिल्या. पुलाच्या कामाच्या बाबतीत कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नसल्याचे तसेच वाईकर नागरिकांचे अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होणार असून नव्याने उभारण्यात येणारा पूल हा वाईच्या वैभवात भरच घालेल. त्यामुळे पुलावरून जाणारी पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन, पुलाला असणारी गॅलरी, पुलाचे सुशोभिकरण, डांबरीकरनाचा दर्जा या कामांमध्ये कोणतीही तडजोड नको. काम पूर्ण झाल्याशिवाय पुल वाहतुकीस खुला करू नये अशा सूचना केल्या.






