
Women dont have father or husband do Ladki Bhaini Yojana eKYC in Anganwadi maharashtra news
Ladki Bahin Yojana : पुणे : महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेत असते. लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र हे ई-केवायसी करताना वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड देणे आवश्यक करण्यात आले होते. मात्र अशा अनेक महिला आहेत ज्यांचे पती आणि वडील दोन्ही नसल्यामुळे अशा महिलांना ई-केवायसी करताना मोठ्या अडचणी येत होत्या. यावर आता राज्य सरकारकडून तोडगा काढण्यात आला आहे. याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मार्ग सांगितला आहे.
महिलांना ई-केवायसीदरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्याने अनेक महिलांची मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, आता अशा महिलांसाठी शासनाने विशेष सुविधा सुरू करून दिली आहे. यामध्ये संबंधित लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करून त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी. त्यानंतर शहानिशा करून त्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे संबंधित लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. मात्र ३१ डिसेंबरपर्यंत त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रांची पुर्तता लाभार्थी महिलांना करावी लागणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लाडकी बहीण योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी करून पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची प्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे ३१ डिसेंबरपर्यंत जमा करावी. अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई-केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) यांचेमार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या महिलांबाबत नंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे महिला व बाल विकास आयुक्तांमार्फत शासनास शिफारस करणार आहेत. दरम्यान, वडील आणि पतीही हयात नाहीत, घटस्फोटीत लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्रे जमा करावीत असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी आनंद खंडागळे यांच्याकडून करण्यात आले आहे.