मुंबईत महिला उद्योग केंद्र स्थापन करणार, पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती
पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन महिलांकरिता रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी तसेच त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासन विविध योजना राबवित आहे. या अनुषंगाने मुंबई शहरातील महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करुन स्वावलंबी होता यावे यासाठी आवश्यक ते पाठबळ दिले जात असून महिलांसाठी उद्योग केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
हे देखील वाचा: राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात मोठी वाढ, ४० हजार होमगार्डना होणार लाभ
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना याबरोबरच महिलांकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याकरिता षण्मुखानंद सभागृहात मुंबई शहर जिल्हा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी महिलांना विविध योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, मुंबईत महिलांना स्वतःचा व्यवसाय करता यावा यासाठी विविध उपक्रम सुरू केले जात आहेत. कोळीवाड्यांमध्ये फूड कोर्टच्या माध्यमातून कोळी भगिनींच्या हाताला काम मिळत आहे. रात्री रिकाम्या असणाऱ्या रस्त्यांवर त्या त्या भागामध्ये प्रचलित पदार्थांचे स्टॉल लावण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
राज्यातील महिलांना सोयी सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, त्यांच्या सशक्तीकरणास चालना देणे आणि त्यांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वांगीण व सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण अंतर्गत शासन स्तरांवर विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहे.
राज्यामध्ये मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहरात आतापर्यंत ४ लाख २४ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून लाभ हस्तांतरणासाठी ३ लाख ९६ हजार ४९१ अर्ज शासनास पाठविण्यात आले आहेत. त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.